शिरूर -कारेगावातील वृद्धा करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आजपासून पाच दिवस पुकारलेल्या जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी उत्सूफर्त बंद पाळण्यात आला. शिरुर नगरपरिषद प्रशासन, किराणा असोसिएशन, कापड दुकानदार, मेडिकल असोसिएशन, भाजीविक्रेते फळविक्रेते, डेअरी, सर्व छोटे-मोठे व्यावसायिक, सर्वपक्षीय कार्यकर्ते यांनी प्रतिसाद दिला.
शिरूरजवळील एका खासगी हॉस्पिटलमध्ये कारेगावातील बाधित वृद्धेने उपचार घेतले होते. तसेच कारेगाव परिसरातून मोठ्या प्रमाणात शिरूर शहरात येणाऱ्या नागरिकांचा वावर, या पार्श्वभूमीवर शिरूर नगरपालिका सतर्क झाली आहे. शहरातील नागरिकही याबाबत गंभीर झाल्याने नगर परिषदेच्या वतीने शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते व सर्व व्यावसायिक यांना विनंती केली. अखेर शहरात पाच दिवस संपूर्ण व्यवहार बंद करण्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नागरिकही आज घराबाहेर पडले नाहीत.
शहरात येणारी इतर वाहनेही अडवण्यात आली होती. अद्यापपर्यंत नगरपालिका प्रशासन, सर्व व्यावसायिक सर्वपक्षीय कार्यकर्ते हे पोलीस, आरोग्य कर्मचारी यांच्या सतर्कतेमुळे अद्याप एकही रुग्ण आढळला नसल्याने मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले. पाच दिवसांच्या कालावधीत शहराबाहेरील नागरिकांनी शहरात येऊ नये. शहरातील सर्व व्यवसाय बंद आहेत, यासाठी नागरिकांनी नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन स्वच्छता आरोग्य विभागाचे सभापती विठ्ठल पवार यांनी केले आहे.