देहूगाव – तीर्थक्षेत्र देहू – आळंदी जाणाऱ्या मार्गावर देहू- तळवडे हद्दीवर प्रवेशद्वार आणि जलवाहिनीसाठी रस्त्याचे खोदकाम सुरु आहे. या खोदकामामुळे रस्त्यावर एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे तासन्तास होणाऱ्या वाहतूककोंडीने वाहनचालक व कामगार वर्ग हैराण झाले आहेत. पावसाळ्यात तरी अत्यावश्यक कामे वगळता इतर कामे रस्ते खोदकाम रोखण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
तीर्थक्षेत्र देहू आणि आळंदी या मार्गावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या तळवडे हद्दीवर आळंदी कडे जाणाऱ्या पिंपरी चिंचवडला भामा आसखेड धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या भूमिगत जलवाहिनीचे काम सुरू आहे. या कामाकरिता रस्त्याची खोदाई सुरू आहे. तसेच पिंपरी -चिंचवड प्रवेशद्वाराचे कामही सुरू असल्याने आळंदीकडे जाणारा मार्ग बंद असून एकेरी वाहतूक सुरू आहे. गेली दिड महिन्यांपासून पाऊसही सुरू आहे. अधिक महिन्यामुळे तीर्थक्षेत्राच्या दर्शनार्थ येणाऱ्या भाविकांची संख्या वाढलेली आहे. चाकण, भोसरी, तळवडे परिसरामध्ये असणारे एमआयडीसी आणि छोट्या-मोठ्या वर्कशॉप असल्याने मोठ्या प्रमाणात कामगारांचीही या मार्गावर वर्दळ असते.
खोदकाम सुरू असल्याने एकेरी वाहतूक सुरू असून त्यामुले सुमारे एक किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी होत असून तासन्तास वाहतूककोंडी होत आहे. वाहतूक कोंडीने कामगारालाही कंपन्यांमध्ये, घरी वेळेवर जाता येत नसल्याचे चित्र आहे. तर तळवडे विभागातील वाहतूक पोलिसांना भर पावसातही वाहतूक कोंडी सोडविताना दमछाक होत आहे. रस्त्यांवरील राडाराडा आणि चिखल – मातीमुळे दुचाकी घसरून अपघातही घडत आहे. परिसरात वास्तव्य असणाऱ्या नागरिकांना आणि पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालतानाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
पावसामुळे ठिकठिकाणी खड्डे बनले असून रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामे वगळता इतर कामे पावसाळ्यानंतर केली जावीत . तसेच वाहतुकीस रस्ता सुरळीत करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
पायी चालणेदेखील मुश्किल
एकचवेळी रस्ता खोदकामाची दोन कामे सुरु आहेत; तर पावसामुळे वाहनांच्या टायरला चिटकून या खोदकामाची माती येत असल्याने पावसानंतर हा रस्ता चिखलमय होतो. दुचाकीस्वारांनातर कसरत करत वाहन चालवावे लागते. विशेष म्हणजे स्थानिक रहिवाशांनादेखील याठिकाणाहून पायी चालणे कठिण झाले असल्याचे चित्र आहे.