पुणे – पुणे जिल्हा परिषद भरतीप्रक्रियेला चार वर्षांनंतर अखेर मुहूर्त मिळाला आहे. गट “क’ सवंर्गातील 21 पदांच्या तब्बल एक हजार जागांसाठी सरळ सेवा भरतीप्रक्रिया राबविण्यात येत आहे. आजपासून (दि.5) ऑनलाइन अर्ज करता येईल, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांनी दिली.
पुणे जिल्हा परिषदेच्या विविध पदांसाठी 2019 मध्ये सरळ सेवा भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, ही भरतीप्रक्रिया मध्यंतरीच स्थगित करण्यात आली. त्यामुळे हजारो उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी होती. त्यानंतर प्रत्यक्षात पुन्हा एकदा भरती प्रक्रिया सुरू होत असल्याने उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य शासनाने मान्यता दिल्यानंतर राज्यभरात एकूण 20 जागांसाठी प्रत्येक जिल्हा परिषदेत सरळ सेवा भरती होत आहे. सर्वाधिक नाशिक जिल्हा परिषदेत 1 हजार 38 आणि त्यापाठोपाठ पुणे जिल्हा परिषदेत 1 हजार जागांसाठी ही भरती होणार आहे. “आयबीपीएस’ या खासगी यंत्रणेद्वारे ही सर्व प्रक्रिया होत आहे. अर्ज करण्यासाठी 5 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट अशी मुदत देण्यात आली आहे. अर्जासाठी लिंक : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/
60 हजार उमेदवारांना मोठा दिलासा…
यापूर्वी 2019 मध्ये जिल्हा परिषदेच्या विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी 60 हजार उमेदवारांनी अर्ज केले होते. मात्र ही परीक्षा होऊ शकली नाही. त्यामुळे अर्जासोबत भरलेली शुल्काची रक्कम उमेदवारांना परत केली जाणार आहे. एवढेच नव्हे, तर या सर्व उमेदवारांना वयामध्ये शिथिलता देण्यात आली आहे. मात्र या उमेदवारांना आताच्या परीक्षेसाठी स्वतंत्रपणे अर्ज करणे आवश्यक आहे, अशी माहिती राहुल गावडे यांनी दिली.