नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पावसामुळे आजूबाजूच्या गुरुग्राम, नोएडा आणि फरीदाबाद या शहरांतील काही भागांत पाणी साचले. त्यामुळे वाहन चालकांना वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागले.
बुधवारी सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे दिल्ली आणि गुरुग्राम वाहतूक शाखा पोलिसांनी लोकांसाठी सूचना जारी केली आहे. त्यानुसार पाणी साचलेल्या रस्त्यांची माहिती देण्यात आली आहे.
दिल्ली ट्रॅफिक पोलिसांनी ट्विटरवर पाणी साचलेल्या सर्व रस्त्यांची माहिती दिली आहे. त्याचबरोबर दुसरा पर्यायी रस्ताही सुचविला आहे.
गुरुग्राम ट्रॅफिक पोलिसांनीदेखील ट्विटरवर जोरदार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे लोकांना याबाबत जागृत करून लोकांना घरीच थांबण्याची सूचना केली आहे. गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडावे, असेही सांगितले आहे.
मागील 24 तासांत गुरुग्राममध्ये 158 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पाऊस थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने दिल्लीकरांचे सर्व व्यवहार तात्पुरते थांबले आहेत. पावसाचा जोर कायम राहणार असल्यामुळे दिल्लीजवळच्या शहरांनाही याचा फटका बसला आहे.