पिंपरी – वाल्हेकरवाडी, पेठ क्रमांक 30 येथे पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने व्यापार संकुल (कन्व्हेअन्स शॉपिंग सेंटर) तर, प्राधिकरणातील पेठ क्रमांक 25 येथे सांस्कृतिक भवन उभारण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांची चांगली सुविधा मिळू शकणार आहे.
प्राधिकरणातर्फे एकूण 1 हजार 212 चौरस मीटर (12 गुंठे) जागेत हे व्यापार संकुल उभारले जाणार आहे. तळमजल्यासह दुमजली इमारतीत हे व्यापार संकुल नियोजित आहे. येथे एकूण 31 गाळे उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक गाळ्याचे क्षेत्र 141 ते 245 चौरस फूट इतके असणार आहे. त्यासाठी 3.30 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
प्राधिकरणाच्या वाल्हेकरवाडी येथे सध्या सुरू असलेल्या गृहप्रकल्पालगत हे व्यापार संकुल नियोजित आहे. त्यामुळे संबंधित गृहयोजना पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना जवळच व्यापार संकुलाची सुविधा मिळू शकणार आहे. काम पूर्ण करण्यासाठी दीड वर्षाची मुदत देण्यात आली आहे. व्यापार संकुलाची उभारणी झाल्यानंतर छोट्या व्यावसायिकांची सोय होऊ शकणार आहे. कामाच्या निविदेला मंजुरी देण्याचा प्रस्ताव लगतच्या प्राधिकरण सभेसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. ही मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कार्यादेश देऊन कामाला सुरवात होईल.
सहा कोटी 24 लाख रुपयांचा खर्च
प्राधिकरणातील पेठ क्रमांक 25 येथे सांस्कृतिक भवन उभारण्याचे नियोजित आहे. एकूण 1 हजार 340 चौरस मीटर जागेत हे भवन नियोजित आहे. भवनाचे बांधकाम क्षेत्र 1 हजार 281 चौरस मीटर असणार आहे. मूळ निविदा रक्कम 7 कोटी 20 लाख आहे. तुलनेत 13.25 टक्के कमी दराने म्हणजे 6 कोटी 24 लाख 60 हजार रुपये इतक्या दराने हे काम दिले जाणार आहे. काम पूर्ण करण्यासाठी 21 महिन्यांची मुदत दिलेली आहे. सांस्कृतिक भवनाची इमारत पार्किंगसह दुमजली असणार आहे. इमारतीत 257 चौरस मीटरचा मुख्य हॉल असेल. त्यामध्ये 315 व्यक्तींची आसन क्षमता असणार आहे. त्याशिवाय, 2 स्वतंत्र खोल्या, 315 चौरस मीटरचे स्वयंपाकघर (162 व्यक्तींची आसन क्षमता) असणार आहे. भवनात हवा खेळती राहावी, यासाठी सौरऊर्जवर आधारित व्यवस्था असणार आहे. संबंधित केंद्राच्या निविदेसाठी देखील प्राधिकरण सभेच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.