#video: मतदान करण्यासाठी बनविला ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा रॅम्प

बारामती (प्रतिनिधी) – बारामती शहर व तालुक्यात दोन दिवस संततधार पावसाने हजेरी लावली त्यामुळे शहरातील तसेच, तालुक्यातील काही मतदान केंद्रे पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकशाहीच्या उत्सवाला पावसाचे गालबोट लागला आहे. तालुक्यातील कांबळेश्वर येथील मतदान केंद्र देखील पाण्याखाली गेले.

दरम्यान, येथील नागरिकांनी प्रशासनाच्यावतीने नामी शक्कल लडवली आणि मतदान उत्साहात पार पडले. याठिकाणी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा रॅम्प तयार करून मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्याची भूमिका येथील तरुणांनी केली आहे. ट्रॉलीचा रॅम्प तयार करण्यासाठी त्यांनी मतदानाच्या आदल्या दिवशीची रात्र जागून हे काम केले.

नीरा नदीची पाण्याची पातळी वाढल्यानंतर कांबळेश्वर येथील मतदान केंद्राच्या आवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. प्रत्यक्ष मतदानाच्या आदल्या दिवशी अशी परिस्थिती निर्माण झाल्याने गावकऱ्यांच्या संभ्रमावस्था निर्माण झाली. मात्र यावर पर्याय शोधण्यात गावकरी यशस्वी ठरले.

गावातील ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या सहाय्याने रॅम्प बनविण्याचा निर्णय त्यांनी घेतला गावातील सर्व ट्रॅक्टरच्या ट्रॉली एकत्र करून त्यांनी रॅम्प बनवला. प्रशासनाची देखील त्यांना योग्य साथ मिळाली त्यामुळे मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचून मतदान करणे शक्य झाले.

दरम्यान, कांबळेश्वरकरांवर आलेल्या नैसर्गिक संकटावर मात करत अनोख्या प्रयोगाद्वारे त्यांनी मतदान यशस्वीपणे पार पडले याचे कौतुक बारामती तालुक्यात सर्वत्र होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.