मतदान आमच्याच पारड्यात…

भाजपचे उमेदवार पाटील, राष्ट्रवादीचे भरणे यांनी व्यक्त केला विश्‍वास

रेडा- इंदापूर तालुका विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांनी भरणेवाडी गावच्या बोराटे वस्ती येथील मतदान केंद्रावर आपल्या कुटुंबीयांसमवेत सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास मतदान केले. तर राज्याचे माजी सहकारमंत्री व भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत बावडा गावी सकाळच्या प्रहरात मतदान केले. आपल्याच पक्षाला मतदारांकडून भरघोस मतदान होणार, असा विश्‍वास राष्ट्रवादीचे उमेदवार भरणे आणि भाजपचे उमेदवार पाटील यांनी व्यक्त केला आहे.

इंदापूर तालुक्‍यातील जवळपास सर्वच गावच्या हद्दीत पावसाने रात्रीपासूनच सुरुवात केली होती, त्यामुळे सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरू असताना देखील युवक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क उस्फूर्तपणे बजावला. तद्‌नंतर पावसाने उघडीप दिल्यामुळे व ऊन पडल्यामुळे मतदारांच्या रांगा प्रत्येक मतदान केंद्रावर लागलेल्या होत्या. सकाळपासून दुपारपर्यंत मतदार केंद्रावर आणून मतदानाचे कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन मतदरांना केले जात होते. नीरा नदी परिसरात असलेल्या या गावांमध्ये सलग दोन दिवस पाऊस सुरू असल्याने रस्त्यावर दलदल झाली होती. तरीदेखील बोराटवाडी, पिठेवाडी, निरवांगी, निमसाखर, सराटी, भगतवाडी, भोडणी तसेच शेटफळ हवेली, शहाजीनगर, रेडा, वडापुरी भागातील मतदारांनी आपल्या शेतातून पाऊल वाट काढत मतदान केंद्रावर येत मतदानाचा हक्क बजावला.

बावडा येथे महायुतीचे उमेदवार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पत्नी भाग्यश्री पाटील, पुणे जि.प.सदस्या व कन्या कु.अंकिता पाटील, चि.राजवर्धन पाटील यांच्यासमवेत सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. सकाळी 10 वाजता येथील जिल्हा परिषद शाळेत त्यांनी मतदान केले. हर्षवर्धन पाटील म्हणाले की, इंदापूर विधानसभा मतदारसंघातून आपला विजय निश्‍चित असून आहे. भरणेवाडी येथे दत्तात्रय भरणे म्हणाले की, इंदापूर तालुक्‍यातील विजयाची गुढी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष उभारणार आहे.

इंदापूर शहरात तसेच निमगाव केतकी गावात भिगवन शहरात सकाळच्या प्रहरापासून मतदारांनी रांगा लावल्या होत्या. नवीन मतदारांचे पहिले मतदान होणार असल्यामुळे मतदान केंद्रावर नवोदित युवा मतदारांनी आपल्या सेल्फी मतदानाचा आनंद व्यक्त केला. पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे सभापती प्रवीण माने यांनी रुई गावच्या मतदान केंद्रावर दुपारी मतदानाचा हक्क बजावला. इंदापूर शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी मतदानाचा हक्क बजावला तर इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी नारायणदास रामदास हायस्कूल येथील मतदान केंद्रावर कुटुंबिया समवेत जाऊन मतदान केले.

  • कार्यकर्त्यांची धावपळ…
    इंदापूर तालुक्‍यातील बहुतेक गावात सकाळी सातच्या प्रहरात पावसाने हजेरी लावल्यामुळे मतदार राजाला केंद्रावर कसे आणायचे यासाठी सर्वपक्षीय पुढारी व कार्यकर्त्यांची धावपळ उडाली. पावसात चिंब होऊन मतदारांना केंदावर आणण्याचे काम सुरू होते. मात्र, काही तासातच पावसाने उघडीप दिल्यामुळे नेत्यांची चिंता मिटली. कार्यकर्त्यांना मात्र संध्याकाळी पर्यंत धावपळ करावी लागली.

Leave A Reply

Your email address will not be published.