पुणे – लॉक डाऊनमध्ये बेरोजगार झालेल्या चौघांनी एकत्र येत बळीराजांचे ट्रॅक्टर व दुभती जनावरे चोरायचा सपाटा लावला होता. शिरूर, पारनेर आणी जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर त्यांनी चोरले होते. ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात तक्रारी येऊ लागल्याने पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तातडीने पथके नेमत गुन्हेगारांचा माग काढला. त्यांना अटक करुन दहा ट्रॅक्टर, पिकअप, दुभती जनावरे असा 77 लाख रुपयांचा माल जप्त केला आहे.
सतीश अशोक राक्षे ( रा. बेलवंडीफाटा, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर, सध्या रा.राजमाता बिल्डींग, बाबुरावनगर, शिरूर,ता. शिरूर ) यास त्याचे राहते घरातून ताब्यात घेतले असता त्याने त्याचे साथिदार ज्ञानदेव उर्फ माऊली विनायक नाचबोणे ( रा.रम्यनगरी कॉलनी, धनु झेंडे यांचे बिल्डींगमध्ये, शिरूर, ता. शिरूर, जि. पुणे, मुळ रा. जयनगर, ता. औसा, जि. लातूर) प्रविण कैलास कोरडे ( मुळ रा. बोरी, ता. जुन्नर, जि. पुणे, सध्या रा. राजमाता बिल्डींग, बाबुरावनगर, शिरूर,ता. शिरूर, जि.पुणे) व सुनिल उर्फ भाऊ बिभीषण देवकाते ( रा. इरले, ता. बार्शी, जि. सोलापूर) यांच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानूसार सर्वांना अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, शिरूर तालुका, पारनेर तालुका, जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर चोरीचे बरेच गुन्हे घडत होते. त्याअनुशंगाने पोलीस अधीक्षक श्री.डॉ.अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहीते यांनी स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत सक्त सुचना दिल्या होत्या. त्यानुसार घनवट यांनी सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे, सहायक फौजदार दत्तात्रय गिरमकर, उमाकांत कुंजीर, जनार्दन शेळके,सचिन गायकवाड, दत्तात्रय तांबे, पोलीस अंमलदार दिपक साबळे, राजू मोमीण, अजित भुजबळ, गुरू जाधव, मंगेश थिगळे, पो.कॉ. संदिप वारे, जितेंद्र मांडगे, अक्षय जावळे यांचे पथक तयार करून तपासकामी रवाना केले होते.
दरम्यान पथकाला शिरूर शहरात राहणारे सतीश अशोक राक्षे, ज्ञानदेव उर्फ माऊली विनायक नाचबोणे व प्रविण कैलास कोरडे हे तिघेही एकत्रात फिरतात. तसेच ते कोणताही कामधंदा करीत नसून ते वेगवेगळे ट्रॅक्टर, पिकअप अशा गाडया आणतात. त्या चोरीच्या असाव्यात अशी खबर मिळताच स्थानिक गुन्हे शाखा पथकाने एकुण 76 लाख 88 हजार किंमतीचे 10 ट्रॅक्टर, 2 पिकअप, 1 बोलेरो जिप, 1 स्कॉपीओ, 6 मोटार सायकल, ऑक्सीजन सिलेंडर, घरगुती गॅस सिलेंडर, गॅस कटर, 5 गायी, नट बोल्ट खोलावयाचे पाने असा मोठा मुद्देमाल हस्तगत केला.
.. असे वळाले गुन्हेगारीकडे
आरोपी सतीश राक्षे याने कर्ज काढून स्कॉर्पीॅओ व पिकअप जीप खरेदी केली होती. तो लॉकडाऊनमध्ये कर्जबाजारी झालेला असल्यामुळे त्याने चोरी करण्याचा मार्ग निवडला होता. सतीश राक्षेच्या बहीणीचे प्रविण करडे याचेसोबत लग्न झालेले होते. त्यामुळे ते दोघेजण एकत्रात चोरी करीत होते.सतीश राक्षे यास लहानपणापासून ट्रॅक्टरची आवड होती त्यामुळे त्याने सुरवातीस ट्रॅक्टर चोरीच निर्णय घेतला. त्याचदरम्यान सन 2020 मध्ये लॉकडाउननंतर काम सुटलेला तिसरा आरोपी ज्ञानदेव उर्फ माऊली नावबोणे हा त्यांना मिळाला. त्यास सर्व प्रकारची वाहने चालविता येत असल्यामुळे त्या तिघांनी मिळून ट्रॅक्टर चोरीस सुरवात केली. दरम्यान इरले ( ता.बार्शी, जि. सोलापूर) येथील राहणारा सुनिल देवकाते यास पिकअप गाडीची आवश्यकता होती. तो पुर्वी शिरूर येथे ड्रायव्हरचे काम करीत असताना सतीश राक्षे याचे ओळखीचा झालेला होता त्यामुळे तो देखील सतीश राक्षे टोळीशी मिळून चोरी करू लागला त्याने ठिकाणी सतीश राक्षे टोळीशी मिळून चोरी केली आहे.
ट्रॅक्टर चोरीनंतर आरोपींनी पिकअप चोरी केली व जनावरांमध्ये जास्त पैसे मिळत असल्याने आरोपींनी जनावरे चोरीस सुरवात केली. त्यांना इतर चोरी करता न आल्यास ते मोटार सायकल चोरी करीत होते. यातच ए.टी.एम.चोरीमध्ये एकाचवेळी मोठया प्रमाणावर पैसे कमाविण्यासाठी कल्पना आरोपींनी सूचली होती. ऑक्सीजन गॅस, घरगुती गॅस, गॅसकटर, नट-बोल्ट खोलावयाचे पाने चोरले व त्याचे आधारे ए.टी.एम. चोरी करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात त्यांना यश मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी पतसंस्थेची भिंत फोडून आतील रक्कम चोरी करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना लॉकर तोडता आले नाही.