नवी दिल्ली – संयुक्त किसान मोर्चाने प्रजासत्ताक दिनी (२६ जानेवारी) ट्रॅक्टर परेड करण्याचे ठरवले आहे. देशातील सुमारे ५०० जिल्ह्यांत तशा परेडचे आयोजन केले जाणार आहे.
केंद्र सरकारची आर्थिक धोरणे उद्योग जगतासाठी अनुकूल असल्याचा आरोप संयुक्त किसान मोर्चाने केला आहे. ती धोरणे चव्हाट्यावर आणण्याच्या उद्देशातून मोर्चाने ट्रॅक्टर परेडचा संकल्प केला आहे.
परेडमध्ये सहभागी शेतकरी लोकशाही, संघराज्यीय व्यवस्था, धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद या राज्यघटनेतील तत्वांचे रक्षण करण्याची शपथ घेणार आहेत. परेडआधी मोर्चाकडून जनजागरण मोहीम हाती घेण्यात येईल. त्या मोहिमेवेळी मोर्चाचे सदस्य घरोघर जाऊन पत्रकांचे वाटप करणार आहेत.
तीन केंद्रीय कृषी कायद्यांना विरोध दर्शवण्यासाठी सुमारे तीन वर्षांपूर्वी अनेक शेतकरी संघटना संयुक्त किसान मोर्चाच्या छताखाली एकवटल्या. त्या मोर्चाच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या सीमांवर आंदोलन झाले.
त्या आंदोलनामुळे संबंधित कायदे मागे घेण्यात आले. त्यावेळी शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांविषयी सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाली नसल्याने मोर्चाकडून सातत्याने आक्रमक पवित्रा घेतला जातो.