मंचर – श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे शनिवार-रविवार या सलग दोन दिवसांच्या सुट्यांमुळे भीमाशंकर परिसर दुमदुमून गेला होता. सुरू झालेले धबधबे, निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती, त्यामुळे वाहतूक कोंडीचा मनस्ताप अनेकांना सहन करावा लागला.
शनिवार व रविवार या सलग सुट्टीमुळे हा परिसर गजबजून गेला होता. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक व पर्यटकांचा लोंढा हा भीमाशंकर येथे येत असतो. येथे येणाऱ्या पर्यटकांमध्ये दिवसेंदिवस खासगी वाहनाचे म्हणजेच टेम्पो, बस, टॅक्सी, ट्रॅव्हलर अशा वाहनांचा वावर वाढला आहे, त्यामुळे भीमाशंकर येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.
पार्किंग क्र. एक व दोन फुल झाल्याने भीमाशंकरपासून निगडाळेपर्यंत रस्त्याकडेला वाहतूक होती. घोडेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने भीमाशंकर येथील वाहतूककोंडी सुरळीत करण्यात येत होती, त्यामुळे काही काळ वाहतूककोंडीवर नियंत्रण आणता आले. वाहन पार्किंग व्यवस्था अपुरी असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे.
“भीमाशंकर येथे वाहन पार्किंग व्यवस्था क्षमता वाढवणे गरजेचे आहे. वाहतूक कोंडी झाल्यामुळे एसटी बस बसस्थानकापर्यंत पोहोचू शकत नव्हत्या. सुट्टीच्या काळात वृद्ध भाविकांना एसटी बसपर्यंत पोहोचणे मुश्किल झाले होते. त्यामुळे भीमाशंकर येथे खासगी वाहनांना स्वतंत्र पार्किंग होणे अत्यंत गरजेचे आहे.”
– प्रदीप आमोडकर, संचालक, शरद बॅंक, मंचर