पुणे – दि कॉसमॉस को-ऑप. बँक लि. या मल्टिस्टेट शेडयूल्ड बँकेला दि. ३१ मार्च २०२३ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात रू.५१४ कोटी ऑपरेटिंग प्रॉफिट, रू. २१३ कोटी करपूर्व नफा व रू. १५१.४१ कोटींचा निव्वळ नफा झाला असल्याचे बँकेचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांनी जाहीर केले. मार्च २०२३ अखेर संपलेल्या वर्षात बँकेची आर्थिक स्थिती भक्कम असून एकूण निधी रू.१६९१ कोटी आहे तर बँकेच्या भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण (सीआरएआर) १३. ५४% आहे.
सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरिता सभासदांनी केलेल्या शिफारशीनुसार ८% लाभांश वाटपास परवानगी देण्याची शिफारस रिझर्व्ह बँकेकडे करण्यात येणार आहे. बँकेची ११७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार दि. १० जुलै २०२३ रोजी शिवशंकर सभागृह, महर्षीनगर, पुणे येथे आयोजित करण्यात आली होती.
सर्वसाधारण सभेची सुरूवात करताना बँकेचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांनी सर्व उपस्थित सभासदांचे स्वागत केले आणि दि. ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षातील बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेच्या ठेवी रू.१७,६२९ कोटींवर पोहोचल्या असून, बँकेने रू.१३,११६ कोटींचे कर्जवितरण केले आहे. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात बँकेचा एकूण व्यवसाय रू. ३०,७४५ कोटींहून अधिक झाला आहे.
सदर वार्षिक सर्वसाधारण सभेत दि सिटी को ऑप. बँक लि., मुंबई या बँकेच्या कॉसमॉस को-ऑप. बँकेमधील विलीनीकरण योजनेस सभासदांनी बहुमताने मान्यता दिली. त्यामुळे रिझर्व्ह बँकेकडे त्यास मान्यता देण्याबाबत लवकरच शिफारस करण्यात येईल, असे बँकेचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांनी सांगितले.