- टोल चुकविला आणि वाहतूक पोलिसालाही हूल देण्याचा प्रयत्न
पिंपरी – सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) असल्याचे बनावट ओळखपत्र दाखवून एका बहाद्दराने थेट वाहतूक पोलिसाला हूल दिली. तसेच त्याने टोल नाक्यावर बनावट ओळखपत्र दाखवून टोल न भरता प्रवास केला. हा प्रकार मंगळवारी (दि. 2) सायंकाळी जाधव सरकार चौक, स्पाईन रोड, चिखली येथे घडला.
प्रवीण लक्ष्मण सूर्यवंशी (वय 33, रा. मल्हारपेठ, ता. कराड, जि. सातारा) असे बनावट ओळखपत्र बाळगणाऱ्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात याबाबत चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वाहतूक पोलीस सुनील गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी गायकवाड हे निगडी वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. ते मंगळवारी सायंकाळी स्पाईन रोड चिखली येथे जाधव सरकार चौकात कर्तव्य बजावत होते. वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या तसेच विनामास्क वाहन चालकांवर कारवाई करत होते.
सायंकाळी साडेपाच वाजता होंडा झॅज कार (एमएच-50-एल-2216) मधून आरोपी प्रवीण सूर्यवंशी आला. तो स्वतः अंधेरी वेस्ट, मुंबई येथे सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर कार्यरत असल्याची त्याने फिर्यादी यांना बतावणी केली. तसेच त्याने त्याचे बनावट ओळखपत्र दाखवले. तेच ओळखपत्र टोल नाक्यावर दाखवून त्याने शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.