- भारतमाता नगरमधील बोगस प्लॉटिंग उद्धवस्त
- नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी कारवाई
पिंपरी – हक्काचे छप्पर मिळावे म्हणून गावाकडील जागा, दागिने विकून भोसरीलगत रेडझोनमध्ये बांधलेली अनधिकृत बांधकामे माहापलिकेने जमीनदोस्त केली. बोसग प्लॉटिंगमध्ये फसविलेल्या अनेक नागरिकांची आयुष्यभराची कमाई संपली. अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. अशी वेळ इतर नागरिकांवर येऊ नये, याकरिता महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने थेट रेडझोनमधील बोगस प्लॉटिंगकडे वक्रदृष्टी वळविली आहे. या विभागाकडून भोसरीतील भारतमाता नगरमधील थेट बोगस प्लॉटिंगवरच बुधवारी (दि.3) कारवाई करण्यात आली.
पिंपरी-चिंचवड महापालकेच्या हद्दीतील जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. नेमका याच गोष्टीचा फायदा घेत, राजकीय वरदहस्ताने लॅण्ड माफियांकडून अनधिकृत प्लॉटिंग करण्यात आली आहे. यामध्ये भोसरीलगतच्या चोवीसावाडी येथील रेडझोनच्या जागेचा समावेश आहे. या प्लॉटबाबत नागरिकांना संशय येऊ नये, ही प्लॉटिंग अधिकृत वाटावी, याकरिता अर्धा, एक गुंठ्याच्या प्लॉटची मोजणी करुन संरक्षित केलेले सुनियोजित प्लॉट तयार करण्यात आले आहेत. सध्या पिंपरी-चिंचवड शहरात समाविष्ट गावांमध्ये उपलब्ध असलेल्या भूखंडाची एका गुंठ्याची किंमत 22 ते 25 लाख रुपये असताना, रेडझोनमधील प्लॉटची प्रति गुंठा 12 लाख रुपयांनी विक्री होत असल्याने नागरिक सहजपणे या आमिषाला बळी पडले. बहुतांशी बीड, लातूर, उस्मानाबाद या नागातील अनेक नागरिकांनी याठिकाणचे प्लॉट विकत घेऊन, घरे बांधली. या नागरिकांचा विश्वास बसावा, याकरिता संबंधित लॅण्ड माफियाने स्वत:चे आलिशान घरदेखील रेडझोनमध्येच बांधल होते, ते महापालिकेच्या कारवाईत जमीनदोस्त करण्यात आले आहे.
वास्तविक पाहता, रेडझोनमधील अनधिकृत प्लॉटिंगची बाब निदर्शनास आल्यानंतर महापालिका प्रशासनाने प्रसारमाध्यमांमधून नागरिकांनी अशा ठिकाणी जमीन खरेदी करु नये, अशा आशयाचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, सुनियोजित प्लॉटिंगला भुलल्याने नागरिक हातोहात फसविले गेले.
दुय्यम निबंधक कार्यालायाकडून दस्त नोंदणी
दरम्यान, महापालिका प्रशासनाकडून जिल्हाधिकारी कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालयाशी 2015 पासून पत्रव्यवहार सुरु असुन, प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रातील जमीन व्यवहाराची दस्तनोंदणी न करण्याची विनंती केली आहे. मात्र, मिळणारा महसूल का बुडवायचा? या हेतूने दुय्यम निबंधक कार्यालयांकडून सर्रासपणे या जमीन खरेदीचे दस्त आजही नोंदविले जात आहेत. तर महावितरणकडूनही बिनदिक्कतपणे वीजजोड दिले जातात. चिरीमिरी मिळण्याच्या हेतूने केली जाणारी दस्तनोंदणी व वीजपुरवठा शेकडो नागरिकांच्या आयुष्यभराची कमाई उध्दवस्त करण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. त्याचा या विभागाला ना खेद आहे ना खंत.
दरम्यान, अनधिकृत बांधकामांवरील कारवाईत नागरिकांची आयुष्यभराची कमाई संपल्याने, महापालिका प्रशासनाने यापूर्वीच कारवाई करुन प्लॉटिंग रोखणे गरजेचे होते, अशा तक्रारी प्राप्त होत आहेत. तर अनेक जण आता महापालिकेच्या सर्व्हेअरवर कारवाई करण्याची मागणी करु लागले आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभुमीवर महापालिका प्रशासनाने आता मुळावरच घाव घालण्याचे नियोजन केले आहे. फेब्रुवारी महिन्यात रेडझोनमधील अनेक अनधिकृत जमीनदोस्त केल्यानंतर आता मार्च महिन्यात आपला मोर्चा प्लॉटिंगकडे वळविला आहे.महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने बुधवारी (दि.3) भोसरीलगतच्या भारतमातानगरमध्ये थेट रेडझोनमधील बोगस प्लॉटिंगमधील रस्ते पोकलॅनच्या सहाय्याने उध्दवस्त केले आहेत.
नागरिकांची फसवणूक होऊ नये, याकरिता महापालिका विविध स्तरावर नियोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत बुधवारी (दि.3) रेडझोनमधील अनधिकृत प्लॉटिंगमधील रस्ते व प्लॉटिंगवर कारवाई करण्यात आली.
विजय भोजने
प्रवक्ता, बांधकाम विभाग