मुंबई : लॉकडाऊनच्या काळात दि.२२ मार्च ते २८ एप्रिल या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या १६५ घटनांची नोंद झाली असून यात ६१८ आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस विभागाच्या प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पोलीस अधिकारी कर्मचारी देखील कार्यरत आहेत. या संकटाशी मुकाबला करताना दुर्देवाने २१ पोलीस अधिकारी व १३४ पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी ५ पोलीस अधिकारी व ६ कर्मचारी कोरोनामुक्त झाले असून उरलेल्या १६ पोलीस अधिकारी व १२५ पोलीस कर्मचारी यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुर्दैवाने तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.