शिरूर (पुणे) – शिरूर तालुक्याच्या पूर्वभागातील दहा वर्षीय मुलीस तुला खाऊ देतो असे अमिष देऊन तिचे अपहरण करून तिच्यावर कोळगाव डोळस येथे लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
चंद्रशेखर दिलीप वणशीव (वय 32, रा. गणपती माळ, वडगाव रासाई, ता. शिरूर) असे अटक केलेल्या नराधमाचे नाव आहे. ही घटना 29 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट या दरम्यान घडली आहे. शिरूर तालुक्यातील पूर्व भागात राहणारी अल्पवयीन मुलगी ही आरोपीच्या ओळखीची आहे. चंद्रशेखर वणशीव याने ओळखीचा फायदा घेत शनिवार (दि. 29) ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता खाऊचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीला तिच्या घरापासून स्कुटीवर बसवून तिला वडगाव रासाई, पारगाव व कोळगाव डोळस या ठिकाणी घेऊन गेला. शेवटी कोळगाव डोळस येथे एका छपरामध्ये अल्पवयीन मुलीला रात्रभर ठेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा तिला तिच्या घरी आणून सोडले. त्यानंतर पिडीत मुलीने याबाबत आपल्या घरच्यांना हकीकत सांगितली.
मुलीच्या घरच्यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे याबाबत फिर्याद दिली. यानंतर सहायक पोलीस निरीक्षक बिरूदेव काबुगडे, पोलीस हवालदार सुभाष रुपनवर, पोलीस हवालदार करणसिंग जारवाल, योगेश गुंड यांनी तात्काळ वडगाव रासाई गणपती माळ परिसरातील आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बिरूदेव काबुगडे हे करीत आहेत.