नवी दिल्ली – हवाला किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नरेश जैन याला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली. तब्बल 1 लाख कोटी रूपयांच्या हवाला व्यवहारांशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी ईडीने ती कारवाई केली.
जैन हा दिल्लीस्थित हवाला व्यापारी आहे. तो 2009 पर्यंत दुबईतून हवाला व्यवहार सांभाळत होता. त्यानंतर तो भारतात सक्रिय झाला. तेव्हापासून भारतीय यंत्रणा त्याच्या मागावर होत्या. काही वर्षांपूर्वी त्याला अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) अटक केली.
एनसीबीच्या तक्रारीचा आधार घेऊन ईडीने त्याच्याविरोधात मनी लॉण्डरिंग प्रकरणाची चौकशी सुरू केली. त्यातून जैन आणि त्याच्या साथीदारांनी देश-परदेशांत प्रचंड रकमेचे अवैध आर्थिक व्यवहार केल्याचे निष्पन्न झाले. आता सुमारे 940 बॅंक खाती आणि अनेक बनावट कंपन्या ईडीच्या रडारवर आल्या आहेत.
जैनकडून आर्थिक देवघेवीसाठी बनावट आयात-निर्यात व्यवहारांचा आधार घेतला जात होता. जैनशी संबंधित प्रकरण देशातील बड्या हवाला प्रकरणांपैकी एक मानले जात आहे. त्यामुळे काही बड्या कंपन्या संशयाच्या धुक्यात आल्या आहेत.