निर्भया पथकाला “भय’ कुणाचे?

प्रशांत जाधव
सातारा  – सातारा शहरातील टवाळखोरांच्या गचांडीला पकडून, चार माणसांत फरफटत नेऊन, त्यांची अब्रू घालवणाऱ्या पोलिसांच्या निर्भया पथकाच्या कारवाया थंडावल्या आहेत. त्यामुळे शहरात पुन्हा एकदा टवाळखोरांचे फावल्याने शिक्षण, नोकऱ्यांसाठी घराबाहेर पडणाऱ्या मुलींच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तातडीने लक्ष घालून सातारा शहरा व जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील निर्भया पथकांना “बूस्टर डोस’ देण्याची नितांत गरज आहे.

महाविद्यालयांसमोर रस्त्यावर दररोज होणारे वाद… कॉलेजमध्ये आलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींवर केले जाणारे विनोद… रस्त्याच्या बाजूला गाड्या उभ्या करून तासन्‌ तास गप्पा मारणारी टोळकी… कॉलेजच्या प्रवेशद्वारांसमोर अतिक्रमण केलेल्या खाद्यपदार्थ्यांच्या गाड्यांवर चालणारा धिंगाणा…

ही कोणत्या चित्रपटातील दृश्‍ये नसून सातारा शहरातील शाळा-महाविद्यालयांच्या आसपासची दृश्‍ये आहेत. पोलिसांच्या निर्भया पथकांचे टवाळखोरांना वाटणारे भय कमी झाले आहे का, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. कॉलेजच्या बाहेरील अशा वातारवणाचा त्रास कॉलेज प्रशासनालादेखील होत असल्याने त्यांनी हे प्रकार रोखण्यासाठी त्यांच्या पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, त्याला मर्यादा आहेत. त्यामुळे या प्रयत्नांना पोलिसी खाक्‍याची साथ असणे आवश्‍यक आहे.

शहरातील शाळा, कॉलेजेस, खासगी क्‍लासेसच्या परिसरात मुलींची होणारी छेडछाड रोखण्यासाठी पोलिसांचे निर्भया पथक स्थापन करण्यात आले. या पथकाच्या कामामुळे टवाळांच्या टोळ्यांना चांगलीच जरब बसली होती. मात्र, कॉलेजांमध्ये विविध अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू होताच, कॉलेजच्या बाहेर टाइमपास करीत बसणाऱ्या युवकांची संख्या वाढली.

त्यातून छेडछाडीचे प्रमाणही वाढले आहे. हे प्रकार रोखण्याची जबाबदारी असलेले निर्भया पथक जूनपासून कॉलेजेस सुरू झाली तरी अद्याप सुट्टीवरच आहे, अशी स्थिती आहे. विशेष म्हणजे, कॉलेजच्या आवारात विद्यार्थी-विद्यार्थिनींना सुरक्षा पुरवण्याचे आणि त्यांची छेडछाड होऊ नये, यासाठी कॉलेज प्रशासन प्रयत्न करत आहे. त्यासाठी कॉलेजच्या आवारात “ऍन्टीरॅगिंग’ कमिट्यादेखील कार्यरत आहेत. मात्र, कॉलेजच्या प्रवेशद्वाराबाहेर टोळक्‍याने बसून टाइमपास करणाऱ्या, छेडछाड करणाऱ्या, मुलींना टोमणे मारणाऱ्या युवकांचा बंदोबस्त करणे कॉलेज प्रशासनाच्या हातात नाही. प्रशासन केवळ पोलिसांकडे तक्रार करू शकते किंवा माहिती देऊ शकते. कॉलेज प्रशासनाला मर्यादा असल्याने टवाळांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांची मदत गरजेची आहे.

सातारा शहरात कार्यरत असलेले निर्भया पथक यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या जवळ असलेल्या निर्भया चौकीतून कारभार हाकत आहे. त्यामुळे या परिसरात टवाळखोरी कमी झाली नसली तरी नियंत्रणात आहे. मात्र, धनजंयराव गाडगीळ कॉलेज, शिवाजी कॉलेज, अन्य शाळा, महाविद्यालये शहरात आहेत, याचा निर्भया पथकाला विसर पडल्याचे दिसून येत आहे. एलबीएस कॉलेज, न्यू इंग्लिश स्कूल, क्रांतिस्मृती अध्यापक महाविद्यालय परिसरात टवाळखोरांनी उच्छाद मांडला आहे. या ठिकाणी शिकायला येणाऱ्या मुलींना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

अतिक्रमणे ठरताहेत डोकेदुखी
शहरात वायसी, छ. शिवाजी, डी. जी., महिला महाविद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल, कन्याशाळा, सयाजी विद्यालय, एलबीएस, क्रांतिस्मृती अध्यापक महाविद्यालय, आझाद कॉलेज, अण्णासाहेब कल्याणी यासह अनेक शाळा-महाविद्यालये आहेत. त्या ठिकाणी मोकळी जागा दिसेल तेथे रस्त्यावर खाद्यपदार्थ्यांच्या गाड्यांनी अतिक्रमण केले आहे. या ठिकाणी युवक तासन्‌तास टाइमपास करतात. त्यांना जाब विचारण्यास गेल्यावर ते अंगावर धावून येतात. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घ्यावा, अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्‍त करत आहेत.

“मेहरबानां’च्या मेहरबानीमुळेच
शहरात अनेक ठिकाणी मोकळ्या जागेवर अनेक टपऱ्यांची अतिक्रमणे आहेत, तशीच शाळा, महाविद्यालयांच्या परिसरातही आहेत. परिणामी टवाळांना टाइमपास करण्यासाठी मोक्‍याच्या जागा मिळत आहे. किरकोळ स्वार्थासाठी अशा अतिक्रमणांवर मेहरबानी दाखवणाऱ्या शहरातील “मेहरबानां’नी स्वत:ला आवर घातला तर ही अतिक्रमणे काढली जाऊन तेथे टवाळांचा वावर कमी होईल.

“त्या’ दादाची भलतीच मिजास
वायसी कॉलेज परिसरात शहरातील एक दादा दाढी खाजवत बिनकामाची मिजास करत फिरत असतो. पोराटोरांच्या किरकोळ भांडणांना स्वत:च्या स्वार्थासाठी हा दादा नोठ्या वादाचे स्वरूप देवून त्याच्याकडील गटाच्याविरोधात असणाऱ्यांना मारहाण करून निघून जातो. त्यामुळे कॉलेजमध्ये काही झाले तरी आपल्याला संरक्षण मिळावे म्हणून युवक त्या दादाकडे आपसूक आकर्षित होत असल्याने या दादाचे महत्त्व वाढत असल्याचे बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.