पालिकेच्या सभा तहकुबीचा “विक्रम’

पिंपरी  – आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्‍यता असतानाही पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने महासभा तहकूब करण्याचा सपाटा कायम ठेवला आहे. गेल्या सव्वा दोन वर्षात तब्बल 48 वेळा सभा तहकूब करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी जुलै महिन्यात सलग पाचव्यांदा तहकुबीचा विक्रम केला आहे. ऑगस्ट महिन्यात सभा सलग दुसऱ्यांदा तहकूब करण्यात आल्याने अनेक महत्त्वपूर्ण प्रस्ताव रखडले आहेत.

जुलै आणि ऑगस्टच्या दोन्ही सभा बुधवारी आयोजित केल्या होत्या. या सभेत शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यावर तब्बल साडेसात तास चर्चा झाली. विषयपत्रिकेवरील एकाही विषयावर चर्चा झाली नाही. त्यामुळे या दोन्ही महासभा याच आठवड्यात घेणे अपेक्षित होते. परंतु, भाजप सत्ताधाऱ्यांनी तसे न करता. दोन्ही महासभा तब्बल 13 दिवस लांबणीवर टाकल्या. सप्टेंबरमध्ये विधानसभेची आचारसंहिता लागण्याची शक्‍यता असतानाही सभा लांबणीवर टाकल्या आहेत. आता या जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या दोन्ही महासभा 3 सप्टेंबर रोजी आयोजित केल्या आहेत.

जुलै महिन्यात कचऱ्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता. पालिका कचरा संकलनासाठी दरमहा प्रत्येक घरामागे 60 रुपये लादण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावरुन महासभेत गदारोळ होण्याच्या शक्‍यतेने जुलैची महासभा सलग पाचव्यांदा, ऑगस्ट महिन्याची सभा दुसऱ्यांदा तहकूब करण्यात आली. कचऱ्याचा प्रश्‍न मार्गी लागत नसल्याने महासभा पुढे ढकलली जात होती, असा “घरचा आहेर’ उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी दिला आहे.

अवघ्या 47 नगरसेवकांची उपस्थिती

महापलिकेच्या बुधवारी झालेल्या सभेत सलग सहा तास पाणी प्रश्‍नावर चर्चा झाली. मात्र, या सभेला अवघे 47 नगरसेवक उपस्थित होते. महापालिका सभागृहात 128 निवडून आलेले तर पाच स्विकृत असे 133 संख्याबळ आहे. परंतु, निम्म्याहून अधिक नगरसेवकांनी सभेकडे पाठ फिरविली. तर काही नगरसेवक रजिस्टरवर स्वाक्षरी करुन गायब झाले. त्यावरुन बहुसंख्य नगरसेवक महासभेबाबत गंभीर नसल्याचे दिसून आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.