वाघोलीत बसमध्ये चोरीप्रकरणी चौघांना अटक

चोरीचा माल घेणाराही जेरबंद : 14 गुन्हे उघडकीस : 4 लाख 36 हजारांचा ऐवज जप्त

वाघोली – पीएमपीएमएल बसमधील प्रवाशांकडील रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तूंची चोरी करणाऱ्या वाघोली परिसरातील चौघे आणि चोरीचा माल घेणारा एक अशा पाच जणांच्या टोळीला पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली. त्यांच्याकडून 14 गुन्हे उघडकीस आले, असून 4 लाख 36 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
कृष्णा उर्फ अण्णा पोपटराव गव्हाणे (केसनंद फाटा, वाघोली), आकाश ऊर्फ तात्या अहिवळे (धनकवडी), मंगेश उर्फ मंग्या सुरेश उकरंडे (केसनंद, वाघोली), सुरज किशोर सोनवणे (खराडी) असे बसमध्ये चोरी करणारे, तर हुकूमसिंग राजसिंग भाटी (रक्षक नगर, खराडी) असे चोरीचा माल खरेदी करणाऱ्यांचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहर व पीएमपीएमएल बसने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ व महिलांचे दागिने, पैसे चोरीच्या घटना घडत असल्याने पोलिसांनी स्वतः बसमध्ये प्रवास करून गुन्ह्यांची उकल करण्यास सुरुवात केली. पुणे स्टेशन येथे बसमध्ये चढण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता या टोळीने बंडगार्डन, स्वारगेट, शिवाजीनगर, वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 14 गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे.

तपासादरम्यान त्यांच्याकडून 4 लाख 6 हजार रुपये किमतीचे 107 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 30 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त आणखीन गुन्हे केले असल्याचेही टोळीने सांगितले असून, अधिक तपास पोलीस करीत आहेत. पोलीस उपायुक्त बच्चन सिंग, सहाय्यक पोलिस आयुक्त शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)