शेवगाव (प्रतिनिधी) – शहरटाकळी येथील तरुणाच्या खूनप्रकरणी शेवगाव पोलिसांनी चार तरुणांना अटक केल्याने भातकुडगाव फाट्यावरील रास्ता रोको आंदोलन स्थगित करत गावबंद आंदोलन आटोपते घेतले.
शहरटाकळीत लक्ष्मीमाता देवीची छबीना मिरवणूक चालू असताना अक्षय संजय आपसेटे (वय २४) यास गावातील ७ ते ८ जणांनी घातक शस्त्रांनी मारहाण करून जबर जखमी केले होते.
मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी एकास अटक केली होती, तथापि ग्रामस्थांचे यावर समाधान झाले नाही. त्यांनी सर्व आरोपीना अटक करेपर्यंत गावबंदचा निर्णय घेऊन आज सोमवारी भातकुडगाव फाट्यावर रास्ता रोकोचा इशारा दिला होता.
मात्र, पोलिसांनी काल रात्रीच संबंधित आरोपींना अटक केल्याने ग्रामस्थांनी आजचा रास्ता रोको रद्द करून गाव बंद आंदोलन आटोपते घेतले. संबंधित गुन्ह्यात अजय दावीद कोल्हे (वय २०), किरण उत्तम चव्हाण (वय २०), अविनाश साईनाथ पवार (वय १९), अनिल रामदास मोरे (वय २३, सर्व रा.शहरटाकळी, ता. शेवगाव) या आरोपींना अटक करण्यात आली.