शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा लाभ घ्यावा

जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांचे आवाहन; आरोग्यासाठी आयुष्मान योजना कार्यान्वित

सातारा – प्रधानमंत्री किसान मानधन योजना (पीएमकेएमडीवाय) संपूर्ण देशात नऊ ऑगस्टपासून सुरु करण्यात आली आहे. या योजनेत 18 ते 40 वयोगटातील दोन हेक्‍टरपर्यंत शेती असलेले शेतकरी पात्र आहेत.

पात्र लाभार्थ्यांना 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रती महिना तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. तसेच लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना निवृत्ती वेतन मिळण्याची तरतूद या योजनेत करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी पत्रकार परिषदेत केले.

जिल्ह्यात पाच लाख रूपयांच्या रकमेपयर्तंचे उपचार घेण्यासाठी आयुष्मान योजनादेखील कार्यान्वित करण्यात आली असून त्या योजनेचा गरजू नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देवीदास ताम्हाणे आदी उपस्थित होते. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यात चार लाख 33 हजार शेतकरी कुटुंबांची नोंदणी करण्यात आलेली आहे. या शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात.

यातील पात्र शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट करणार आहे. त्यांचा हप्ता त्यांच्या संमतीनुसार पीएम किसान योजनेच्या लाभातून कपात करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सिंघल यांनी सांगितले. या योजनेत समाविष्ट होण्यासाठी शेतकऱ्यांनी आपले आधारकार्ड घेऊन आपले सरकार सेवा केंद्रावर नोंदणी करुन घ्यावी.

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेमुळे शेतकऱ्यांना एक आर्थिक कवच मिळणार आहे. या योजनेच्या जनजागृतीसाठी प्रत्येक गावांमध्ये शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (एनपीएस), कर्मचारी राज्य विमा निगम योजना, कर्मचारी फंड ऑर्गनायझेशन स्किम यासारख्या इतर कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजनांतर्गत लाभ घेणारे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी या योजनेस अपात्र असतील. कामगार आणि रोजगार मंत्रालयाद्वारे प्रकाशित प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेमध्ये निवडण्यात आलेले शेतकरी या योजनेस अपात्र असतील.

त्याचबरोबर जमीन धारण करणारी संस्था, संवैधानिक पद धारण करणारी अथवा केलेली आजी, माजी व्यक्ती, आजी- माजी मंत्री, खासदार, आमदार, महापालिकेचे महापौर व जिल्हा परिषद अध्यक्ष. केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत व निवृत्त अधिकारी, कर्मचारी, शासन अंगीकृत संस्था, स्वायत्त संस्थेतील व स्थानिक स्वराज्य संस्थेतील अधिकारी, कर्मचारी (चतुर्थ श्रेणी व गट ड वर्ग कर्मचारी वगळून), मागील वर्षी आयकर भरलेल्या व्यक्ती, नोंदणीकृत व्यवसायिक डॉक्‍टर, वकील, अभियंता, सनदी लेखापाल (सी.ए.), वास्तुशास्त्रज्ञ (आर्किटेक्‍ट) इत्यादी क्षेत्रातील व्यक्ती अपात्र असतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

ई-कार्ड नोंदणीसाठी पत्र प्राप्त झालेल्या लाभार्थ्यांनी पंतप्रधानांच्या स्वाक्षरीचे पत्र, रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड (सत्यप्रती) घेऊन आपली नोंदणी करावी. ही नोंदणी करण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्रावर 30 रुपये शुल्क भरावे लागेल. तर 14 रुग्णालयांमध्ये मोफत नोंदणी केली जाईल.

सातारा तालुक्‍यातील जिल्हा रुग्णालय, संजीवन आयसीयु प्रा.लि., आंको लाईफ सेंटर शेंद्रे, कोरेगाव तालुक्‍यातील श्रीरंग नर्सिग होम, कराड तालुक्‍यातील शारदा हॉस्पिटल, कृष्णा हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल, कोळेकर हिॉस्पटल, के. एन. गुजर, फलटण तालुक्‍यातील निकोप हॉस्पिटल, लाईफ लाईन हॉस्पिटल, सावित्री हॉस्पिटल, लोणंद, डी.जे. काटकर हिॉस्पीटल वडूज, घोटावडेकर हॉस्पिटल, वाई या 14 रुग्णालयांमध्ये पाच लाखापर्यंतचे मोफत उपचार केले जाणार आहेत.

आयुष्मान योजनेचा लाभ घ्या

नागरिकांच्या आरोग्यासाठी केंद्र शासनाने आयुष्मान भारत योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत केले जाणार असून पंतप्रधानांच्या स्वाक्षरीचे पत्र प्राप्त झालेल्या कुटुंबांनी या योजनेच्या लाभासाठी आपले सरकार सेवा केंद्रावर तसचे जिल्ह्यातील या योजनेंतर्गत असलेल्या 14 रुग्णालयांत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)