सातारा – संमतीपत्र देण्यास वेळ लावल्याच्या कारणावरून सातारा तहसीलदार कार्यालयातील अव्वल कारकून राजेंद्र रंगराव खरात (रा. रेवडी, ता. कोरेगाव) यांना आज दुपारी साडेतीनच्या सुमारास मारहाण झाली. त्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी दुपारनंतर काम बंद आंदोलन केले. खरात यांना मारहाण करणाऱ्या अरविंद धोंडिराम कदम (रा., हॉटेल सुरुबनशेजारी, सदरबझार) यांच्यावर कारवाई करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली.
या प्रकरणी खरात यांनी कदम यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खरात हे सातारा तहसील कार्यालयात अव्वल कारकून असून ते सेतू कार्यालयात कार्यरत आहेत. अरविंद कदम व अन्य एक जण दुपारी साडेतीन वाजता कार्यालयात आले. शशिकला कदम यांच्या नावाने वीज कनेक्शन घेण्यासाठी संमतीपत्र बनवायचे आहे, असे त्यांनी सांगितले.
त्यावेळी कागदपत्रांची छाननी करताना संबंधित महिला कोठे आहे, असे खरात यांनी विचारले. त्यावर, त्या घरी असून त्यांना घेऊन येतो असे कदम म्हणाले. माजी आमदारांच्या मुलाला तुम्ही ओळखत नाही का, असे कदम यांच्याबरोबर आलेल्या व्यक्तीने विचारले. त्यानंतर दोघांनी आरडाओरडा केला.