टोकियो – ऑलिम्पिक रजतपदक विजेती भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या अकेन यामागुचीचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली. या सामन्यात सिंधूने यामागुचीला निष्प्रभ करताना 21-13, 22-20 असा विजय मिळवला.
पहिली गेम सिंधूने 21-13 असा जिंकला व सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली. सिंधूने दुसऱ्या गेममध्ये 11-6 अशी आघाडी घेतली. यामागुचीवर संपूर्ण वर्चस्व राखताना सिंधूने आपली गुणवत्ता सिद्ध केली. यानंतर मात्र यामागुचीने जोरदार पुनरागमन केले व सिंधूवर 16-15 अशी आघाडी घेतली.
अखेरच्या पाच गुणांसाठी प्रचंड स्पर्धा रंगली. 16-16 अशा बरोबरी नंतर यामागुचीने 20-18 अशी आघाडी घेतली होती. सिंधूने आपले सर्वस्व पणाला लावताना पुन्हा एकदा 20-20 अशी बरोबरी केली. त्यानंतर सलग 2 गुण मिळवत सिंधूने दुसरी गेम 22-20 अशी जिंकताना सामनाही खिशात टाकला व उपांत्य फेरीत स्थान मिळवले.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिल्या फेरीत सिंधूने इस्रायलच्या पोलिकार्पोवाचा 21-7, 21-10 असा पराभव केला होता. पूर्व उपउपांत्यपूर्व फेरीत सिंधूने हॉंगकॉंगच्या एनवाई चेयुंगवर 21-9, 21-16 असा विजय मिळवला, तर उपउपांत्यपूर्व फेरीत डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्ट 21-15, 21-13 असा पराभव केला.