टोकियो – भारताचा कुस्तीपटू दीपक पुनियाला टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीत ब्रॉंझपदकाची संधी होती. मात्र, त्याला सॅम मरिनोच्या ऍमिने मायलेस नाजेमकडून 4-2 असा पराभव पत्करावा लागला.
या स्पर्धेतील 86 किलो वजनी गटाच्या लढतीत दीपकने 2-1 अशी आघाडी घेतली होती. मात्र, ही आघाडी त्याला राखता आली नाही.
नाजेमला त्याने तुल्यबळ लढत दिली. मात्र, अखेरच्या 30 सेकंदांत नाजेमने दीपकचा पाय पकडून त्याला गुडघे टेकण्यास भाग पाडले व 3-2 अशी आघाडी घेतली.
पण, भारतीय प्रशिक्षकांनी याविरोधात पंचांकडे दाद मागितली, त्यात पंचांनी नाजेमच्या बाजूने निकाल दिला. तसेच एक गुणही त्याला बहाल केला व परिणामी दीपकला हा सामना 2-4 असा गमवावा लागला.