मतदानासाठी प्रशासन, उमेदवार, कार्यकर्तेही सज्ज; पावसामुळे वाढली धाकधूक
मतदारांच्या स्वागतासाठी विविध उपक्रम
नगर (प्रतिनिधी) –लोकशाहीचा आज महोत्सव साजरा करण्यासाठी जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघात सोमवारी, दि.21 रोजी मतदान होत आहे. या मतदानाची शासकीय पातळीवर सर्व यंत्रणांची जशी तयारी पूर्ण झाली आहे तशीच उमेदवार व कार्यकर्त्यांचीही मतदान घडवून आणण्यासाठी तयारी झाली आहे. मात्र,गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची संततधार सुरु असल्याने हा पावसाचा जोर कायम राहिला तर मतदानाचा टक्का घटून उमेदवारांची धाकधूक वाढू शकते.
जिल्ह्यात बारा विधानसभा मतदारसंघात 18 लाख 7 हजार 853 पुरूष, तर 16 लाख 65 हजार 733 स्त्री व अन्य 157 असे एकूण 34 लाख 73 हजार 743 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. यात 35 हजार नवे मतदार आहेत. तसेच पोस्टल मतांची संख्या 26664 असून 10258 सैनिकांचे मतदान आहे. नगर जिल्ह्यात एकूण बारा मतदारसंघ असून त्यात 116 उमेदवार नशीब अजमावत आहेत. त्यासाठी एकूण 3722 मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी, एक शिपाई व पोलिस असा कर्मचारी वर्ग नेमण्यात आलेला आहे. मतदान प्रक्रियेसाठी 26664 कर्मचारी कार्यरत आहेत. प्रत्यक्ष 22342 कर्मचारी नियुक्त असून अतिरिक्त 10 टक्के मिळून24584 व मतदान केंद्राच्या पारिसरात नियुक्त 1900 असे एकूण 26384 कर्मचारी आहेत.
सलग सुट्ट्यांनी उमेदवारांचे वाढवले टेन्शन
शनिवार, रविवार परत सोमवारी मतदानासाठी शासकीय सुट्ट्या तसेच अनेक शाळांनाही सुट्ट्या लागल्याने मुलांना गावाकडे सोडण्याची गडबड यामुळे अनेक मतदार बाहेरगावी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवार व त्यांच्या कार्यकर्ते टेन्शनमध्ये आले आहेत. जर हे लोक बाहेरगावी गेले तर आपले हक्काची मत वाया जायला नको यासाठी उमेदवार व कार्यकर्त्यांची धावपळ सुरु झाली आहे. दोन दिवस थांबा व मतदान करूनच गावी जा असा आग्रह व विनंती उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते करत आहेत.
मतदानयंत्रे केंद्रावर नेताना कसरत
आज जिल्ह्यातील बाराही मतदारसंघात मतदान मशीन व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले. पावसाच्या संततधारेमुळे ही साधनसामुग्री संबंधित मतदान केंद्रावर नेताना कर्मचाऱ्यांची चांगलीच त्रेधातिरपिट उडाली होती.पावसातून वाट काढताना त्यांना कसरत करावी लागत होती. याचबरोबर प्रशासनाने वेळेत साधनसामग्री उपलब्ध करून न दिल्याने कर्मचाऱ्यांना ताटकळत राहावे लागले त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
कोपरगावची सखी शंभर नंबरी
महिलांचा मतदानाचा टक्का वाढावा यासाठी राज्यात 352 तर, नगर जिल्ह्यातील 16 मतदान केंद्रावर सखी मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. यात जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एक याप्रमाणे बारा, तर नगर शहर व कर्जत-जामखेडमध्ये प्रत्येकी दोन सखी मंच मतदान केंद्राचा समावेश आहे. यातील कोपरगावच्या सखी महिला मतदान केंद्राचा क्रमांक शंभर आहे. या केंद्रात निवडणूक अधिकाऱ्यापासून पोलीस कर्मचाऱ्यांपर्यंत सर्व महिलाराज असणार आहे. या केंद्रात कोणताही विशिष्ठ रंग वापरला जाणार नाही. सदर कर्मचारी आपल्या मनपसंदी रंगाचा पोषाख परीधान करू शकतात. हे केंद्र अधिकाधिक सुंदर व आकर्षक करण्यासाठी रांगोळी, रंगरंगोटी यासह स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला आहे. तसेच सुरक्षिततेची काळजीही घेण्यात आलेली आहे. पोलीस व महसूलचे वरिष्ठ अधिकारी या सखी मतदान केंद्राच्या सतत संपर्कात असणार आहेत.
प्रशासनाच्या गोंधळाने कर्मचाऱ्यांचे हाल कायम
जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेसाठी जे कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत. त्यांच्या मूलभूत सुविधेकडे निवडणूक प्रशासनाने कोणतेही लक्ष दिलेले नाही. प्रसारमाध्यमे व विविध कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी याविषयावर प्रशासनाचे सतत लक्ष वेधले. मात्र आश्वासानाखेरीज यात कोणताही बदल झाला नाही. अनेक कर्मचाऱ्यांना चुकीच्या ठिकाणी नियुक्त्या, त्यातून कारवाईच्या नोटिसा, महिला कर्मचाऱ्यांना स्वतःचा तालुका सोडून इतर तालुक्यात ड्यूटी असे प्रकार सर्रासपणे घडले आहेत. महिलांच्या सुरक्षेसह त्यांच्या येण्या-जाण्याबद्दल कोणतीही व्यवस्था केली नसल्याने महिलांसह कर्मचाऱ्यांचे हाल सुरुच आहेत.
दृष्टीक्षेप…
एकूण मतदारसंघ : 12,
एकूण उमेदवार : 116,
एकूण मतदार : 34,73,743, पुरूष मतदार : 18,07,853, स्त्री मतदार : 16,65,733, अन्य मतदार : 157, पोस्टल मतदार : 26664, सैनिक मतदार : 10258, एकूण कर्मचारी : 26664, क्षेत्रीय अधिकारी : 375,
पथके : 38, स्टॅटिक एसएसटी टीम : 36, व्हीडीओ सर्व्हिलॉन्स टीम : 12, मतदान केंद्र : 3722, सखी मतदान केंद्र : 16, दिव्यांग मतदान केंद्र : 10, वेब कास्टींग मतदान केंद्र : 416, विविध परवाने : 1320, मतदानयंत्रे ः
बी.यु. : 7000, सी.यु. : 5230, व्ही.व्ही.पॅट : 5450