आणखी दोन दिवस पावसाचा मुक्‍काम

लक्षद्विपजवळील चक्राकार स्थितीमुळे कमी दाबाचा पट्टा

पुणे – पहाटे पडणारे हलके धुके आणि हळूहळू वाढत जाणारा गारठा अशी हिवाळ्याची चाहुल देणारे वातावरण निर्माण होण्याची वाट पाहणाऱ्या नागरिकांना चक्क पुन्हा एकदा पावसाळ्याचा अनुभव घ्यावा लागत आहे. गेले दोन दिवसांपासून राज्यात कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रात अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. पुण्यातही आज सकाळपासून सरीवरसरी कोसळत आहेत. राज्यात पावसाची ही स्थिती आणखी दोन दिवस तरी राहणार आहे.

ऋतुचक्रानुसार सध्याचे वातावरण म्हणजे ऑक्‍टोबर हीटचा जोर थोडा कमी होऊन थंडीची चाहूल देणारा असतो. वातावरणही स्वच्छ असते पण सध्या या ऋतुचक्राचा विसर पडलेला दिसतो. गेले दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. शुक्रवारपासून वातावरणात बदल होण्यास सुरवात झाली.काही प्रमाणात ढगाळ वातावरण निर्माण होत होते.त्यानंतर शुक्रवारी रात्रीपासून तर कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाला सुरुवात झाली.पुण्यातही शनिवारी पहाटे पासून पावसाला सुरवात झाली आहे.पावसाचे हे संकट आणखी दोन दिवस राहणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रात लक्षद्वीपजवळ चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. मंगळावार पर्यत हीच स्थिती राहणार आहे.पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकणात या पावसाचा जोर अधिक असणार आहे. पुणे, मुंबईसह राज्यातील विविध भागात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्‍यता व्यक्त केली आहे. या रविवारी सायंकाळी पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरीसह राज्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली. साताऱ्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. कोल्हापुरात सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. कोकणात पावसाचा जोर अधिक आहे. सावंतवाडी मध्ये गेल्या चोवीस तासात 100 मिलिमीटर पाऊस झाला. रत्नागिरीमध्येही पावसाचा जोर पकडला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात कालपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे तर काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.