Demonetisation : मोदी सरकारने केलेल्या नोटबंदीच्या घोषणेला आज 8 नोव्हेंबर रोजी सात वर्ष पूर्ण झाली आहेत. 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री 8 वाजता जनतेला संबोधित केले होते. त्यावेळी त्यांनी 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. मोदी सरकराच्या या निर्णयानंतर देशभरातील लोकांची एकच तारांबळ उडाली होती. नोटबंदीनंतर एटीएम आणि बँकांच्या बाहेर नागरिकांच्या मोठ्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. नव्या नोटा 500 आणि 2000 च्या नव्या नोटा त्यावेळी चलनात आणल्या होत्या.
8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री 8 वाजता समोर आलेल्या एका बातमीने देश आणि जगाला धक्का बसला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना मध्यरात्री 12 पासून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्यात येणार असल्याची घोषणा केली. तसेच एका मर्यादित रकमेपर्यंत या नोटा बँकांमध्ये बदलता येणार असल्याचेही स्पष्ट केले.
नोटाबंदी करण्यामागची तीन कारणे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी करण्यामागची तीन कारणे असल्याचे सांगितले होते. नोटाबंदीमुळे काळा पैसा नष्ट करण्यास मदत होऊ शकते, बनावट नोटांची समस्या या निर्णयामुळे सोडली जाऊ शकते. याशिवाय दहशतवाद्यांचे आर्थिक स्रोत बंद करण्यासाठी देखील हा निर्णय घेतल्याचे सांगितले होते.
डिजिटल पेमेंटमध्ये वाढ
नोटाबंदीमुळे व्यवहार प्रक्रियेचे डिजिटलायझेशन होण्यासही मदत झाली. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) 11 एप्रिल 2016 रोजी लाँच करण्यात आला. तेव्हापासून त्याच्या वापरात झपाट्याने वाढ झाली. आजकाल Paytm, Phonepay, Google Pay, BHIM UPI द्वारे पेमेंट करणे लोक अधिक करून पसंत करतात. एका सर्वेक्षणानुसार, भारतातील एकूण किरकोळ डिजिटल पेमेंटमध्ये UPI चा वाटा 78 टक्क्यांहून अधिक होता.
दोन हजारांची नोट चलनातून बाहेर
दोन हजारांची नोट बाजारात आल्यानंतर या नोटा चलनातून बाहेर करण्यासाठी या वर्षी मे महिन्यात मुहूर्त काढण्यात आला. 23 मे ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत गुलाबी नोटा बंद करण्यात आल्या. पण यावेळी जनतेला त्रास झाला नाही. कारण गुलाबी नोटा अगोदरच चलनातून कमी झाली होती. 30 सप्टेंबर रोजी ही डेडलाईन 7 ऑक्टोबर 2023 रोजीपर्यंत वाढविण्यात आली. आता या नोटा रिझर्व्ह बँकेच्या 19 विभागीय कार्यालयात बदलण्याची सुविधा आहे.