विविधा : विश्‍वेश्‍वरय्या मोक्षगुंडम

-माधव विद्वांस

भारतातील प्रख्यात स्थापत्य अभियंता सर विश्‍वेश्‍वरय्या मोक्षगुंडम यांचा आज जन्मदिन. भारत, श्रीलंका व टांझानियामध्ये हा दिवस “अभियंता दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यांचा जन्म 15 सप्टेंबर 1861 रोजी कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील चिक्‍कबल्लापूर तालुक्‍यातील मुद्देनहळ्‌ळी येथे झाला. त्यांचे पूर्वज आंध्र प्रदेशातील कुर्नूल भागातील मोक्षगुंडम या गावातील होते. त्यांचे वडील पंडित श्रीनिवासशास्त्री संस्कृतचे गाढे विद्वान होते. 

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांचे उच्च शिक्षण बंगळुरूच्या सेंट्रल कॉलेजमध्ये झाले. 1880 मध्ये ते बीए विशेष गुणवत्तेत उत्तीर्ण झाले. म्हैसूर सरकारने पुढील शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्ती दिली. वर्ष 1883 मध्ये पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून मुंबई विद्यापीठाच्या अभियांत्रिकी पदवी परीक्षेत मुंबई प्रांतात ते पहिले आले.

वर्ष 1884 मध्ये मुंबई सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात नाशिक जिल्ह्यात त्यांची साहाय्यक अभियंता पदावर नियुक्‍ती झाली. पुणे तसेच गुजरातमधील सुरत जिल्ह्यात त्यांनी काम केले. 1904 साली शासनाने आरोग्य अभियंता या पदावर त्यांना बढती दिली. त्यांनी संशोधन करून तयार केलेली स्वयंचलित द्वारे खडकवासला येथील जुन्या दगडी बांधकामाच्या धरणात पहिल्यांदा बसविण्यात आली होती. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टळला. त्यापूर्वी त्यांनी मुंबई सरकारच्या सचिवालयात सार्वजनिक बांधकाम खात्यांतर्गत पाटबंधारे विभागात विशेष अधिकारी म्हणून काम केले.

पुण्याच्या डेक्‍कन क्‍लबच्या स्थापनेत त्यांचा सहभाग होता. वर्ष 1907 साली मुंबई सरकारच्या नोकरीतून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. वर्ष 1909 मध्ये हैदराबाद संस्थानात विशेष सल्लागार अभियंता म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला. त्यावेळी हैदराबाद शहराची पुनर्रचना, मुसा व इसा या दोन्ही नद्यांना धरणे बांधून संभाव्य पुरापासून शहराचे संरक्षण ही कामे त्यांनी केली. त्यानंतर म्हैसूर संस्थानचे नरेश महाराजा कृष्णराज वडियार यांच्या विनंतीनुसार त्यांनी म्हैसूर संस्थानच्या प्रमुख अभियंता पदाची सूत्रे हाती घेतली.

1912 ते 1918 ही सहा वर्षे म्हैसूर संस्थानचे दिवाण म्हणून शिक्षण, उद्योग, कृषी आदी सर्व क्षेत्रांत त्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली. म्हैसूर आर्थिक परिषदेला स्थायी रूप देऊन अनेक विकासकामे हाती घेतली. म्हैसूर बॅंक, म्हैसूर विद्यापीठ, प्राथमिक शिक्षणाचा विस्तार, मुलींचे पहिले वसतिगृह व शेतकी महाविद्यालय, वृंदावन गार्डन यांची उभारणी केली. कन्नड साहित्य अकादमी, म्हैसूरसाठी भटकल बंदराची सोय केली. रेल्वेचे व्यवस्थापन राज्य सरकारच्या कक्षेत आणले. काही ठिकाणी नवीन रेल्वे मार्ग उभारले. 1926 साली त्यांनी म्हैसूर संस्थानच्या सेवेचा स्वेच्छेने राजीनामा दिला. त्यानंतर त्यांचा भद्रावती आयर्न अँड स्टील वर्क्‍स, श्री जय चामराजेंद्र ऑक्‍युपेशनल इन्स्टिट्यूट वगैरे संस्थांशी घनिष्ट संबंध आला.

मुंबईची प्रीमियर ऑटोमोबाइल इंडस्ट्री स्थापण्यात तसेच हिंदुस्थान एअरक्राफ्ट फॅक्‍टरी (सध्याची दि हिंदुस्थान एरॉनॉटिक्‌स) व ग्रामीण औद्योगिक प्रकल्पांच्या योजना मार्गी लावण्यातही त्यांचा सहभाग होता. ओरिसामधील पूरनियंत्रण, मध्य प्रदेशातील तिग्रा धरण तसेच शासनाच्या अनेक योजनांचे ते मार्गदर्शक होते. त्यांच्या कार्यासाठी त्यांना भारत सरकारने वर्ष 1955 मध्ये “भारतरत्न’ हा सर्वोच्च बहुमान बहाल केला. 14 एप्रिल 1962 रोजी वयाच्या 101 व्या वर्षी बंगळुरू येथे त्यांचे निधन झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.