67 वर्षांपूर्वी प्रभात : मंगळवार, ता. 15 माहे सप्टेंबर सन 1953

अमेरिकेच्या युद्धपिपासू धोरणाबाबत ऍटलीचा इशारा 

लंडन, ता. 14 : “”अमेरिकेच्या धोरणाला मान्यता न देणाऱ्या राष्ट्रांना शत्रूवत लेखण्याची अनिष्ट प्रथा अमेरिकेत पडली असून मी कम्युनिस्ट असल्याचा माझ्यावर आरोप करणारी शेकडों पत्रें अमेरिकेतून येत आहेत,” अशा अर्थाचे उद्‌गार ब्रिटनचे माजी मजूरपक्षीय पंतप्रधान क्‍लेमंट ऍटली यांनी आज येथें काढलें.

“”अमेरिका मला शत्रू का मानते?” या प्रश्‍नाला उत्तर देताना ऍटली पुढे म्हणाले, “”कोरियन युद्ध पुनः सुरू झाल्यास ते कम्युनिस्ट चीनच्या सरहद्दीत नेऊं नये, असें मी म्हणतो एवढ्यावरून माझ्यावर हे गालीप्रदान होत आहे. पण मी हे ब्रिटिश जनतेचे मत मांडीत आहें. आक्रमणाचा प्रतिकार करावा म्हणून राष्ट्रसंघाने उत्तर कोरियन कम्युनिस्टांवर शस्त्र धरले; ते काही अमेरिका विरुद्ध कम्युनिस्ट राष्ट्रे यांतील युद्ध नाही. आणि म्हणूनच आशियांत शांतता नांदली पाहिजे, असें आमचे मत आहें.” कोरियन युद्ध पुनः सुरू झाल्यास जागतिक युद्ध सुरू करण्यास ब्रिटिश हुजूर पक्षाने दिलेल्या अनुमतीबद्दल त्यांनीब्रिटिश सरकारचा धिक्‍कार केला.

पुनः कोरियन युद्ध सुरू झालें तर जागतिक युद्ध होणार? 

लंडन, ता. 14 :  “”ब्रिटनचे पंतप्रधान सर विस्टन चर्चिल काहीही म्हणोत, पण ब्रिटननें मजूर पक्षाने अवलंबिलेले कोरियन युद्धविषयक धोरण टाकून दिलेले असून कोरियन युद्धाची व्याप्ती वाढविण्याच्या अमेरिकन धोरणाला ब्रिटन उत्तेजन देत आहे,” असें उद्‌गार ब्रिटिश मजूर मंत्रिमंडळातील राष्ट्रकुल खात्याचे मंत्री पेट्रीक गार्डन वॉकर यांनी आज येथे काढलें.

ते पुढें म्हणाले, “”मांचुरियांतून राष्ट्रसंघाच्या लष्करी तळावर जोराचे हल्ले झाले, तर मांचुरियावर राष्ट्रसंघाने जोरदार बॉम्बहल्ले करावे, या अमेरिकेच्या धोरणाला ब्रिटिश मजूर पक्षाने मान्यता दिली होती. त्यांचा हेतू एवढाच होता की, काही करून राष्ट्रसंघाच्या सैन्याचे संरक्षण व्हावे. पण ब्रिटिश हुजूर पक्षाने याही पुढे जाऊन कोरियन युद्ध पुनः सुरू झाल्यास ते विश्‍व युद्धच सुरू झाले आहे, असे मानून कम्युनिस्टांचा निःपात करण्याची तयारी करावी, या अमेरिकेच्या धोरणाला मान्यता दिली आहें. त्यावरून हुजूर पक्षाची युद्धपिपासू वृत्ती दिसून येते.”

Leave A Reply

Your email address will not be published.