दुष्काळ हटवण्यासाठी सरकार तिजोरी खाली करू -महादेव जानकर

गोंदवले: माण तालुक्‍यातील जनता व अधिकारी दुष्काळ मिटावा म्हणून ऐन उन्हाळ्यात श्रमदान करत आहेत. त्यांना सलाम करायला मी आलोय. दुष्काळ हटवण्यासाठी सरकारी तिजोरी खाली करायची वेळ आली तरी आमचे सरकार मागे पुढे पाहणार नाही, असे प्रतिपादन पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी केले.

कप निमित्त गोंदवले खुर्द येथील फाळके वस्तीनजीक महाश्रमदानाच्या निमित्ताने मोठा उत्सवच भरला होता. गावातील लोकांसह सामाजिक संस्था असे मिळून सुमारे सात हजार लोकांनी याठिकाणी आपला सहभाग नोंदवला. याप्रसंगी ते बोलत होते.

गोंदवले खुर्द येथे सकाळी साडेसात वाजता जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, दहिवडी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल वडनेर यांनी सर्वप्रथम श्रमदानाच्या कामाला सुरुवात केली. सातपुते मॅडमनी कामावरील एका ग्रुपला सोबत घेऊन टिकाव घेत सीसीटी काढण्यास सुरुवात केली आणि बघता बघता चार फूट लांब आणि दोन फूट रुंद अशी चर काढली. त्यानंतर आमदार जयकुमार गोरे यांनी श्रमदान केले व स्वत: यापुढील कामासाठी तीन लाखांचा निधी जाहीर केला. सुरेखा पाखले यांनीही देखील कामावर भेट देत श्रमदान केले. शेखर गोरे भाऊ फाउंडेशनच्या वतीने आज एक रुग्णवाहिका आणि पाण्याचा टॅंकर देण्यात आला होता. पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनीही दहा वाजता भेट दिली. त्यावेळी श्रमदात्यांशी कामाबाबत चर्चा केली आणि टिकाव घेऊन श्रमदान केले. त्यांच्यासोबत मामु शेठ वीरकर, अनिल देसाई व कार्यकर्ते उपस्थित होते.

ना. जानकर म्हणाले, शासनाने केवळ योजना बनवून चालत नाही. लोकांच्या मनात जर आले तर श्रमदानाच्या माध्यमातून व लोकसहभागातून कितीही मोठे काम उभा राहू शकते, हे आज प्रत्यक्ष अनुभवास आले. मी त्यांना आज सलाम करतोय. राज्य सरकारच्या वतीने हा तालुका पाणीदार करण्यासाठी माण खटाव तालुक्‍यातील जनतेला काही कमी पडू देणार नाही. जनावरांच्या चारा छावणी संदर्भात काही बदल केले आहेत. पूर्वी 15 किलो चारा देण्यात येत होता. आता वाढवून 18 किलो केला आहे. जनावरांची मर्यादादेखील वाढवली आहे. गोळी पेंड वाढवली आहे. आम्ही लोकांना पाणी व जनावरांसाठी काहीही करायला तयार असून राज्य सरकार लोकांच्यासाठी तिजोरी खाली करायला कमी करणार नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.