पिंपरी : राष्ट्रवादीचे नेते लागले दुष्काळ निवारणाच्या कामाला

-थेट शरद पवार यांचे आदेश
– चारा, पाण्यासाठी मदतीच्या सूचना

पिंपरी – महाराष्ट्र सध्या दुष्काळाने होरपळत असताना सत्ताधाऱ्यांनी अपेक्षित उपाय योजना न केल्यामुळे राज्यावर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले असून जणावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न यक्ष बनला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी राष्ट्रवादीच्या शहरी भागातील नेत्यांनी ग्रामीण भागातील जनतेला मदत करावी, असे आदेश दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच दिले आहेत. तसेच शहरी भागात पाण्याच्या बचतीसाठी राष्ट्रवादीने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केल्याने शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेस आता दुष्काळ निवारणासाठी आणि शहरातील पाणीगळती रोखण्यासाठी सरसावली आहे.

सध्या संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाने होरपळला जात आहे. आचारसंहिता निवडणुका आणि राज्यशासनाने धोरण यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित मदत मिळत नसल्याने शेतकरी, ग्रामीण भागातील सर्वसामान्य नगारिकांना दुष्काळाची मोठी झळ पोहोचत आहे. लोकसभा निवडणुकीचा चौथा आणि महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा संपताच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी, आमदार, लोकसभेचे उमेदवार व प्रमुख कार्यकर्त्यांची शनिवारी मुंबईत बैठक झाली. या बैठकीत शरद पवार यांनी सर्वच उपस्थितांना दुष्काळग्रस्तांना मदत करण्याच्या सूचना केल्या.

प्रत्येकाने आप-आपल्या ताकदीने मदत करण्याचे आदेश यावेळी दिले. शनिवारची मुंबईतील बैठक झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादीने दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देण्याबरोबरच शहर पातळीवर पाण्याच्या काटकसरीचे आवाहन केले आहे. तसेच पाणीगळती रोखण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. याशिवाय ग्रामीण भागात ज्या ठिकाणी पाणीटंचाई आहे त्या ठिकाणी पाण्याचे टॅंकर पुरविण्याबाबत नियोजन करण्यात येत असल्याची माहिती शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी दिली.

शहरपातळीवर नागरिकांनी पाण्याची काटकसर करावी असे आवाहन वाघेरे यांनी केले असून पाणीगळती रोखण्याबाबत उपाय योजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहराच्या विविध भागात ज्या ठिकाणी सोसायटी, महापालिका अथवा व्यक्तीगत घरांमध्ये पाण्याची गळती होत असल्यास ती रोखण्यासाठी प्लंबर उपलब्ध करून दिले जाणार असून त्यासाठी एक दुरध्वनी क्रमांकही उपलब्ध करून दिला जाणार आहे. नागरिकांना प्लंबरची सोय मोफत स्वरुपात उपलब्ध करून दिली जाणार आहे.

जुनाट जलवाहिन्या बदलण्याची गरज

शहराला सध्या 450 एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. शहराची लोकसंख्या विचारात घेता 350 एमएलडी पाणीदेखील शहराला पुरेसे आहे. शंभर एमएलडी पाणीपुरवठा अधिक होत असतानाही पाणीटंचाई सुरू आहे. महापालिकेच्या बहुतांश ठिकाणच्या जलवाहिन्या या जुनाट झाल्या असून त्यामधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. पाणीगळती रोखल्यास महापालिकेकडे अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध होवू शकतो शिवाय शहरातील पाणीटंचाईही संपुष्टात येवू शकते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.