पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – तरुणाच्या त्रासामुळे शाळकरी मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना लोणी काळभोर परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी प्रणव सुर्वे ( २१, रा. म्हातोबाची आळंदी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार मुलगी दहावीत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून आरोपी तिचा पाठलाग करत होता. मुलीला अडवून तिला त्रास देत होता. तिच्या शाळेच्या आवारात जाऊन तो तिला धमकावत होता. तीन दिवसांपूर्वी मुलगी शेतातून निघाली होती. त्यावेळी प्रणवने तिला अडवून अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला.
प्रणवच्या त्रासामुळे मुलगी घाबरली होती. शुक्रवारीतिने राहत्या घरात आत्महत्येचा प्रयत्न केला. मुलगी अत्यवस्थ झाल्याने तिला कुटुंबीयांनी रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तज्ज्ञांनी चौकशी केली. तेव्हा तिने प्रणवच्या त्रासामुळे आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगितले. या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे तपास करत आहेत.