पिंपरी, दि. 16 (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आर्थिक स्त्रोतात भर घालणाऱ्या कर संकलन विभागाच्या चार विभागीय कार्यालयांना चालू वर्षात मागील (थकीत) आणि चालू आर्थिक वर्षातील मिळकत कर संकलनाचा दोन अंकी आकडा गाठता आलेला नाही. विभागीय कार्यालय स्तरावर प्रभावी कामकाज होत नसल्याने ही कार्यालये पिछाडीवर फेकली गेली. यामुळे कर संकलन विभागाला थकीत कर वसुलीत जबरदस्त फटका बसला. आता 631 कोटी थकीत कर वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची दमछाक होत आहे.
शहरातील मिळकतधारकांकडून मुख्य कर संकलन विभागाने आजअखेर मागील आणि चालू आर्थिक वर्षातील असा एकूण 321.40 कोटी एवढा कर वसूल केला. शहरातील विविध विभागीय कर संकलन कार्यालयांकडून महापालिकेतील मुख्य कर आकारणी व कर संकलन विभागाकडे हा कर जमा केला जातो. याकामी शहराच्या विविध भागात एकूण 17 विभागीय कर संकलन कार्यालये
कार्यारत आहेत.
यामध्ये निगडी प्राधिकरण, पिंपरी नगर, चऱ्होली आणि तळवडे या कर संकलन कार्यालयांचे कामकाज अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. या चार कार्यालयातील प्रशासनाला चालू वर्षात संकलनाचा दोन अंकी आकडा सुध्दा गाठता आलेला नाही. त्यामुळे थकीत कराचा आकडा वाढतच चालला आहे.
तथापि, वाकड कर संकलन विभागीय कार्यालय संकलनात अव्व्ल ठरले आहे. या कार्यालयामार्फत चालू वर्षात 47.53 कोटींचा कर संकलित झाला आहे. त्याखालोखाल थेरगाव कार्यालयाने 30.12 कोटी कर वसूल करत संकलनात भर घातली आहे. सांगवी विभागीय कार्यालयामार्फत 28.18 कोटींची वसुली झाली आहे. त्यानंतर पिंपरी वाघेरे विभागीय कार्यालयाने 23.03 कोटी कर संकलित केला आहे. यामध्ये मागील आणि चालू कराचा समावेश आहे.
मागील (थकीत) कर वसुलीमध्ये निगडी प्राधिकरण, आकुर्डी, पिंपरी वाघेरे, पिंपरी नगर, मनपा भवन, फुगेवाडी दापोडी, चऱ्होली, तळवडे या कार्यालयांचा कर संकलनाचा आकडा तीन कोटीच्या खाली आहे. यामध्ये वाकड विभागीय कार्यालयाने सर्वाधिक म्हणजेच मागील 11.51 कोटी वसूल केले आहेत.
त्यानंतर दिघी बोपखेल कार्यालयाने 10.28 कोटी वसूल केले. चिंचवड कार्यालयाने 8.47 कोटी, किवळे 7.73, चिखली 6.91, मोशी 6.4, सांगवी 6.83 तर भोसरी 5.11 कोटी असा विभागीय कार्यालयनिहाय कर वसूल झाला आहे.
संकलन कामकाजाला गती देण्याची गरज
चालू आर्थिक वर्षाच्या मिळकत करामध्ये वाकड कार्यालय प्रशासनाने 36.46 कोटींची वसुली करत अव्वल कामगिरी केली. त्याखालोखाल थेरगाव 22.21, सांगवी 21.35, पिंपरी वाघेरे 18.62, मनपा भवन 16.41 भोसरी 16.39 कोटी असा कर वसूल झाला. चालू वर्षातील चालू कर वसूल करण्यात पिंपरी नगर, दिघी बोपखेल, तळवडे, चऱ्होली ही कार्यालये 4 कोटींच्या पुढे जाऊ शकली नाहीत. त्यामुळे महापालिकेतील मुख्य कर संकलन विभागाला या चार विभागीय कर संकलन कार्यालयांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे कर वसुलीचा टप्पा गाठण्यात अपयश येत आहे. या विभागीय कार्यालयाच्या प्रशासकीय कामगाजाला गती देण्याची गरज आहे.