तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण शरीरातले एक टक्का जरी पाणी कमी झाले तर डिहायड्रेशन होते. तहान लागली म्हणजेच शरीरातले पाणी कमी झाले असे समजू नका. खेळाडू आणि धावपटूंनी तर पाण्याचे नियोजन केले तरच त्यांना चांगला परफॉर्मन्स दाखवता येईल.
व्यायाम करतानासुद्धा व्यायाम करण्याच्या आधी एक तास एक ते दोन कप पाणी प्या. आणि व्यायामाच्या 15 ते 20 मिनिट आधी पुन्हा अर्धा ते एक कप पाणी प्या. खूप व्यायाम करतानासुद्धा दर 20 ते 30 मिनिटांनी अर्धा कप पाणी प्या. आणि व्यायाम संपल्यानंतर लगेच अर्धा ते तीन कप पाणी प्या.
हातापायांच्या फोडांवर वेळीच इलाज करा
वजन उचलण्याचा व्यायाम करताना तळहाताला किंवा पायावर भार पडल्याने भाजल्यासारखे फोड येतात.त्याचे नंतर घट्टे पडतात. पण या फोडांचा वेळीच उपाय करा. त्यावर पेट्रोलियम जेली लावा. म्हणजे ते मऊ पडतील. फुटणार नाहीत. मुद्दाम फोडूही नका. इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. फोड मोठे झाले असतील तर डोनटच्या आकाराचे पॅड हाताला बांधून फोड जीरेपर्यत ठेवा. फोडाच्या आत पाणी असते. ते बाहेर काढण्यासाठी डॉक्टरांकडून फोडून घ्या. किंवा डिस्पोझेबल सिरींजने सुई आतमध्ये घालून त्यातले पाणी सिरींजमध्ये ओढून घ्या.वरची त्वचा तशीच राहू द्या. साल काढू नका. निर्जंतुक औषधाने साफ करून त्यावर अँटीबायोटीक्स मलम लावा.
हात उबदार होण्यासाठी
क्रिकेटचे खेळाडू मैदानात आल्यावर जसे हात गरगर फिरवतात तसे वॉर्मअप होण्यासाठी फिरवा. हात थंड पडले असतील तर असे फिरवल्याने उब येते. रक्ताभिसरणामध्ये दोष असेल तर रेनॉडस डिसीज नावाचा रोग होतो. तो टाळण्यासाठीसुद्धा हा व्यायाम चांगला आहे
हातातली रॅकेट का फिरते?
हाताची पकड सैल असेल तर टेनिसची रॅकेट हातातल्या हातात फिरते. आणि पकड जास्त घट्ट असेल तर हात दुखायला लागतो
शॉवरचे पाणी कोमट असू द्या
व्यायाम केल्यानंतर शॉवरखाली आंघोळ करताना पाणी कोमट ठेवा. पाणी खूप गरम असेल तर रक्ताभिसरण आणि रक्तदाब कमी होतो. अगदी थंड पाण्याने रक्तदाब वाढतो आणि ह्रदयावर ताण येतो.शॉवरचे पाणी कोमट असावे.
कॉफी जास्त घेऊ नका
रात्री अभ्यास करायचा असेल तर विद्यार्थी जागरणासाठी कॉफी घेतात. कॉफीने झोप येत नाही हे खरे आहे.पण कॉफीमध्य कॅफीन असते. या कॅफीनमुळे ह्रदयाचे ठोके अनियमीत पडतात. थोडीशा चक्कर आल्यासारखे वाटते. फक्त कॉफीमध्येच कॅफीन असते असे नाही.चहामध्येही कॅफीन असते. म्हणून काही कारण नसताना रात्री झोपताना चहा किंवा कॉफी घेऊ नका. दिवसाही एक किंवा दोन कपापेक्षा जास्त चहा किंवा कॉफी घेऊ नका
श्रुती कुलकर्णी