जगण्याचे टॉनिक!

माणूस हा सामाजिक प्राणी आहे. समाजाशिवाय माणसाच्या अस्तित्वाला अर्थ नाही. माणसाचे कर्तृत्व बहरते ते समाजातच! त्यातूनच माणसामाणसांत आंतरक्रिया घडतात. विचाराची, वस्तूंची देवघेव होते. माणसं उपजीविकेसाठी कर्म करतात. माणसाने केलेले कर्म समाजहिताचे असेल तर त्याला सत्कर्म म्हणतात. अशा सत्कर्माला समाज दाद देतो. शाबासकी देतो. उत्तेजन देतो. चांगली प्रतिक्रिया देतो. अशा प्रतिक्रिया बोलक्‍या असतात. माणसाचा उत्साह वाढवणाऱ्या असतात.

तुम्ही चांगले कर्म केले तर माणसं स्मितहास्य करून दाद देतात. कधी हसून मान डोलावतात, कधी आनंदाने हातावर टाळी देऊन आपला आनंद व्यक्‍त करतात. कधी उत्स्फूर्तपणे टाळ्यांचा कडकडाट करतात. डॉ. श्रीराम लागू यांच्या “नटसम्राट’ नाटकातील संवादफेकीला, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या चांदणं शिंपणाऱ्या वक्तृत्वाला आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शिवचरित्र कथनाला मराठी माणसांनी टाळ्यांचा कडकडाट करून दाद दिलेली आहे. महाराष्ट्रात अशी अनेक कर्तृत्ववान माणसे होऊन गेलीत. त्यांनी राजकीय, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा अनेक क्षेत्रांत आपले कर्तृत्व गाजवले आहे. त्यांच्या कर्तृत्वाला, नेतृत्वाला, वक्तृत्वाला लोकांनी भरभरून दाद दिली आहे.

काही माणसांच्या प्रतिक्रिया त्यांच्या हसऱ्या स्नेहपूर्ण डोळ्यांतून व्यक्त होतात. काही लोक हातात हात घेऊन, हस्तांदोलन करून आपला आनंद व्यक्त करतात. तुम्ही जर दूरस्थ ठिकाणी राहात असाल तर फोन करून किंवा पत्र पाठवून तुमचे अभिनंदन केले जाते. ही वाचिक किंवा लिखित प्रतिक्रियाही फार बोलकी असते. स्नेहसंमेलनात बक्षीस मिळविलेल्या मुलाच्या पाठीवर प्रमुख पाहुण्यांचा शाबासकीचा हात पडला तर त्या मुलाला भरून पावल्यासारखे वाटते. नाटकामध्ये काम करणाऱ्या अभिनेत्याला त्याच्या अभिनयाबद्दल तिथल्या तिथे टाळ्यांच्या रूपाने दाद मिळते. वक्‍त्याचे वक्‍तृत्व बहरत जाते आणि त्याच्या विचार वैभवाने दीपून लोक तिथल्या तिथे टाळ्या वाजवून दाद देतात. तर अशी ही चांगल्या कामाची पावती होय. मी शिक्षण क्षेत्रात पस्तीस वर्षे अध्यापनाचे काम केले आहे. अध्यापन करता करता थोडी साहित्य निर्मितीही केली आहे. साने गुरुजी कथामालेच्या माध्यमातून मुलांना गाणी आणि गोष्टीही सांगितल्या आहेत. शिक्षकी पेशाला साजेल असे काम केले आहे. त्यासाठी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भ्रमंती केली आहे. हे कर्म करीत असताना मलाही काही अनुभव आले. कधी दादही मिळाली. ती दाद येथे सांगितली तर वावगे होणार नाही, असे मला नम्रपणे वाटते.

पुण्याला गणेशोत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. काही वर्षांपूर्वी मी आणि माझे मित्र डॉ. अनिल गोडबोले हनुमान टेकडीवरील मंदिरात कथाकथनासाठी गेलो होतो. ते गणेशोत्सवाचे दिवस होते. रात्रीची वेळ होती. श्रोते मर्यादितच होते. आम्ही दोघांनी प्रत्येकी एकेक गोष्ट सांगितली. एकूण कार्यक्रम दीड तास झाला. रात्रीचे अकरा वाजायला आले होते. कार्यक्रम संपल्यावर एक श्रोता मजजवळ आला. माझा हात प्रेमाने हातात घेतला आणि ते मला म्हणाले, “”तुम्ही गोष्ट सांगत नाही.” मी प्रश्‍नार्थक नजरेने त्यांच्या चेहऱ्याकडे पाहू लागलो. मग पुढचे वाक्‍य ते बोलले, “”तुम्ही गोष्ट जगता.” त्यांची ही बोलकी प्रतिक्रिया इतक्‍या वर्षांनंतरही माझ्या स्मरणात आहे.

येरवड्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूलमध्ये शिकवत असताना आम्ही मुलींना रक्षाबंधनासाठी कारागृहात नेत असू. तेथील कैद्यांना राखी बांधत असू. सांस्कृतिक विभागातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले जात असे. एकदा मी तेथील सुमारे दीडशे तरुण बंदिवानांना “झेल्या’ नावाची व्यंकटेश माडगूळकरांची गोष्ट सांगितली. रक्षाबंधनानंतर हा कथाकथानाचा कार्यक्रम झाला. कैद्यांना ती कथा आवडली, भावली. नंतर चार-पाच दिवसांनी माझ्या नावावर कारागृहातून शाळेत पत्र आले. ते संदीप भिवा भिसे या तरुणाने लिहिले होते. पत्रात तो लिहितो,

“”सर, तुमची गोष्ट फार आवडली. तुमच्यासारखे शिक्षक शाळेत असताना मला भेटले असते तर मी असा वाया गेलो नसतो. असो इथून सुटल्यावर मी नीट वागेन. कामधंदा करीन. माझ्या पत्राचे उत्तर जरूर जरूर द्या. वाट पाहत आहे.”
नुकताच 5 डिसेंबरला मी शिरूरजवळच्या न्हावरे गावातल्या हायस्कूलमध्ये गेलो होते. परीक्षेचे काम झाल्यावर पटांगणात मुलांना गोष्ट सांगितली. सुमारे दीड हजार मुले हजर होती. कार्यक्रम संपल्यावर पाचवीतील दोन मुले मजजवळ आली. कृश प्रकृतीची, सावळ्या वर्णाची, युनिफॉर्ममध्ये असलेली ती मुले मला म्हणाली, “”सर, तुमची गोष्ट फार आवडली. मज्जा वाटली.” या मुलांच्या प्रतिक्रिया ऐकून समाधान वाटले. असा या बोलक्‍या प्रतिक्रिया मनात घर करून राहतात. जगण्याची उमेद वाढवतात. या प्रतिक्रिया म्हणजे जगण्याचे टॉनिकच आहे म्हणा ना!

डॉ. दिलीप गरूड

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.