जयपूर – राजस्थानच्या चर्चेत असलेल्या IAS अधिकारी टीना डाबी आणि डॉ. प्रदीप गावंडे यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 20 एप्रिल रोजी साध्या पद्धतीने दोघांचा विवाह झाला. त्यानंतर 22 एप्रिलला जयपूरच्या आलिशान हॉटेलमध्ये रिसेप्शन देण्यात आले. लग्न आणि रिसेप्शनचे फोटो आता समोर आले आहेत.
टीना डाबी आणि प्रदीप गावंडे यांचे 20 एप्रिल रोजी लग्न झाले. फार कमी लोक लग्नात सहभागी झाले होते. लग्नाचा फोटो समोर आला असून, त्यात डॉ.आंबेडकरांच्या फोटोसमोर हे जोडपे उभे आहे. या फोटोत दोघेही खूप खुश दिसत आहेत. दोघांनी पांढरे कपडे परिधान केले होते.
टीना डाबी आणि प्रदीप गावंडे यांनी 22 एप्रिल रोजी त्यांच्या नातेवाईक आणि मित्रांसाठी रिसेप्शनचे आयोजन केले होते. सोशल मीडियावर काही पाहुण्यांनी त्यांच्या लग्नाचे फोटो पोस्ट केले आहे. स्वागत समारंभात मुख्य सचिव उषा शर्मा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव कुलदीप रांका, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार निरंजन आर्य, प्रधान सचिव अखिल अरोरा, प्रधान सचिव अपर्णा अरोरा, मुख्यमंत्र्यांच्या सचिव आरती डोगरा, मुख्यमंत्र्यांचे सचिव गौरव गोयल, जयपूरचे जिल्हाधिकारी राजन विशाल, आयएएस अधिकारी उपस्थित होते. ओमप्रकाश कासेरा, भवानी सिंह देठा, चित्तोडगडचे जिल्हाधिकारी अरविंद पोसवाल, भरतपूरचे जिल्हाधिकारी आलोक रंजन, जयपूरचे आयुक्त आलोक श्रीवास्तव, एडीजी गोविंद गुप्ता रिशेप्शनला उपस्थित होते. त्यांनी वधू-वरांना शुभेच्छा दिल्या.
टीना डाबी या 2016 बॅचच्या राजस्थान केडरच्या अधिकारी आहेत तर प्रदीप गावंडे 2013 बॅचचे अधिकारी आहेत. टीना या सह वित्त (कर) सचिव आहेत, तर डॉ. गावंडे पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालक आहेत. 29 वर्षीय टीना डाबीचे हे दुसरे लग्न आहे, तर प्रदीप गावंडेचे पहिले लग्न आहे. टीनाचे पहिले लग्न काश्मीरचे आयएएस अधिकारी अतहर अमीर उल शफी खान यांच्यासोबत झाले होते, परंतु त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही. जयपूर येथील कौटुंबिक न्यायालयामध्ये ऑगस्ट 2021 मध्ये या जोडप्याचा घटस्फोट झाला. दोघांनी UPSC परीक्षेत टॉप केले होते आणि लग्न केले होते, ज्यामुळे हे जोडपे रातोरात हिट झाले होते.