पुणे : महापालिकेकडून स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेसाठी स्वच्छतागृहांच्या डागडुजी आणि बाह्य रंगरंगोटीसाठी लाखो रूपयांची दुरूस्ती केली जात असली तरी प्रत्यक्षात आत मधून स्वच्छतागृहांची भयानक दुरावस्था झालेली असून स्वच्छरागृहाच्या दुर्गंधीत नागरिकांना दिवस काढावे लागत आहेत.
दांडेकरपूल स.नं 10 मधील विवेकानंद मंडळाजवळ अशाच प्रकारे तुंबलेल्या स्वच्छतागृहामुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरलेली असून महापालिकेचे कर्मचारी त्याकडे सोयीस्कर दूर्लक्ष करत आहेत. गेल्या वर्षभरात या स्वच्छतागृहांच्या रंगरंगोटीवर वारंवार खर्च करण्यात आला आहे.
हे स्वच्छतागृह दाट लोकवस्तीत असल्याने ते स्वच्छ राहणे आवश्यक असताना त्याची नियमित स्वच्छता होत नाही. तर ते तुंबले तर तक्रारी करूनही कोणीही स्वच्छतेसाठी येत नसल्याचे या भागातील स्थानिक नागरिक राम पालखे यांनी सांगितले. तसेच महापालिकेकडे वारंवार तक्रारी केल्यानंतरही केवळ उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचे ते म्हणाले.