बीड : आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा टिकटॉक स्टार संतोष मुंडे याचे निधन झाले आहे. विजेचा धक्का लागून संतोषचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. निधनाची बातमी कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. संतोषसोबतच बाबुराव मुंडे यांचाही मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली.
संतोष मुंडे आणि बाबुरा मुंडे हे दोघे डीपीचा फ्यूज बदलण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. संतोष मुंडे हा फेमस टिकटॉक स्टार होता. त्याच्या निधनाची बातमी कळताच अनेकांनी दु:ख व्यक्त केले आहे.
बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील भोगलवाडी या ठिकाणी ही घटना घडली आहे. अगदी कमी काळामध्येच संतोषने टिकटॉकच्या माध्यमातून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. संतोष मुंडे या त्याच्या हटके स्टाईलसाठी ओळखला जात होता. त्याचे लाखोंच्या वर फॉलोवर्स आहेत.
अस्सल ग्रामीण शैलीमध्ये तो मनोरंजन करत होता. शेतामध्ये बसून तो कायमच टिकटॉकवर व्हिडीओ तयार करायचा. आपल्या अभिनयानं त्यांनी लाखो प्रेक्षकांना भुरळ पाडली होती. मात्र, त्याचा दुर्दैवी अंत झाल्यानं सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.