दुर्दैवी लेकराची निर्दयी माता, नवजात बाळाला गवतात फेकून पोबारा

बाळाचा आक्रोश ऐकून नागरिक हेलावले : पुण्याच्या उंड्री परिसरातील घटना

पुणे – मुलगी जन्माला आली म्हणून त्या अर्भकाला गवतात फेकून मातेने पोबारा केल्याची घटना उंड्री परिसरात उघडकीस आली आहे. या गवतातील कीटक बाळाला चावे घेत होते. त्यामुळे ते आक्रोश करत होते. या आवाजाच्या दिशेने शोध घेतला असता, स्थानिकांच्या प्रयत्नांमुळे या बाळाला जीवदान मिळाले. या मातेला तातडीने शोधून तिला कठोर शासन करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.

 

उंड्री येथील होलेवस्ती चौकाजवळच गुरुवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास नवजात बाळाचा रडण्याचा आवाज संकेत भिंताडे, पंकज कामठे, लक्ष्मण दिवेकर, प्रेम भिंताडे, अभिजीत भिंताडे, तुषार भिंताडे, विठ्ठल भिंताडे यांना आला. त्यांनी आवाजाच्या दिशेने शोध घेतला असता, रस्त्याबाजूच्या गवतामध्ये त्यांना नवजात बाळ दिसले. त्यांनी तातडीने कोंढवा पोलीस आणि सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भिंताडे यांना ही माहिती दिली.

 

या बाळाला गवतातील मुंग्या आणि कीटक चावत होते. त्यामुळे ते बाळ व्याकुळ होऊन आक्रोश करत होते. पोलीस आणि ग्रामस्थांनी बाळाला स्थानिक डॉक्टर विनायक मासाळ यांच्याकडे नेले. त्यांनी मुंग्या काढून बाळाला स्वच्छ केले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी बाळाला ससून सर्वोपचार केंद्रात दाखल करण्यात आले आहे. ही सर्व प्रक्रिया पार पडेपर्यंत रात्रीचे दीड वाजले.

 

या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात अज्ञात मातेवर गुन्हा दाखल केला आहे. कोंढवा ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विनायक गायकवाड यांच्या सुचनेनुसार सहायक पोलीस निरिक्षक दादाराजे पवार या अभागी बाळाच्या माता-पित्याचा तपास करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.