भोसरी – सध्या करोना शहरात थैमान घालत आहे. करोनावरील उपचारांसाठी अनेक रुग्णालये आणि कोविड सेंटर कार्यरत आहेत. परंतु इतर कोणत्याही आजारावर उपचार घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये, दवाखान्यात करोना चाचणी अहवाल असल्याशिवाय दाखल करून घेतले जात नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आतोनात हाल होत आहेत. परंतु अजूनही माणुसकी शिल्लक असल्याने अशा गरजूंना मदतीचा हात मिळत असल्याचे दर्शविणारी एक घटना सध्या चर्चेत आली आहे.
भोसरी येथील शासकीय स्वॅब कलेक्शन सेंटर येथे एक ज्येष्ठ पुरुष अत्यवस्थ परिस्थितीत रिक्षातून आला होता. हाताला सलाइन व इंजेक्शनसाठी सुई लावण्यात आली होती. हातापायांमध्ये त्राण नव्हते. शरीर प्रकृती साथ देत नव्हती अशा स्थितीमध्ये कोविडची तपासणी करण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ व्यक्तीला रिक्षातून उतरून सेंटरपर्यंत येण्यास देखील हातापायांमध्ये त्राण शिल्लक राहिले नव्हते.
परंतु दवाखान्यात, हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्यासाठी तुम्ही अगोदर कोविडचा रिपोर्ट आणा, असे सांगितले जात आहे. परंतु परिस्थिती बेताची असल्याने खासगी लॅबमध्ये कोविडची चाचणी करण्यासाठी पैसे नसल्याने त्याने शासकीय लॅबचा दरवाजा खटखटवायचा निर्णय घेतला. एक रिक्षा करून तो भोसरी येथील शासकीय स्वॅब कलेक्शन सेंटर येथे आला. परंतु तब्येत इतकी खालावली होती की ते रिक्षातून उतरून चालू शकत नव्हते. त्याची ही परिस्थिती स्वॅब कलेक्शन सेंटरमधील कर्मचाऱ्यांना समजली तेव्हा ते त्यांच्या मदतीसाठी धावून आले.
डॉक्टर ऐश्वर्या मनीष जाधव यांनी ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा भावसार व डॉ. लक्ष्मीकांत अत्रे यांच्या मार्गदर्शानाखाली, पारिचारिका स्मिता यांना सोबत घेऊन रस्त्यावर उभा असलेल्या रिक्षातच ज्येष्ठ नागरिकाची अँटीजेन टेस्ट करून घेतली.
दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे इतर आजारांच्या रुग्णांनाही भेटायला कोणी येताना दिसून येत नाही. एवढी दहशत सध्या करोनाने माजवली आहे. तसेच अनेक डॉक्टर आणि नर्स देखील करोनाच्या बळी ठरल्या आहेत. अशा काळात ज्येष्ठ नागरिक करोना चाचणी करण्यासाठी शासकीय स्वॅब सेंटर येथे येतात तेव्हा येथील डॉक्टर, नर्स व इतर कर्मचारी मदतीसाठी धावून जातात, हे पाहिल्यानंतर अशा काळात देखील माणुसकीचे दर्शन पाहण्यास मिळत आहे.