मंचर -चांडोली बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील न्हायरे मळा रस्त्यावर कारने मोटारसायकलला कट मारल्याने मोटारसायकल चालक पडल्याने जखमी झाला. गाडीने कट मारली या कारणावरून तिघांना मारहाण केल्याची घटना येथे घडली आहे. याबाबत सुरेश ज्ञानेश्वर थोरात यांनी दोघांविरोधात मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश ज्ञानेश्वर थोरात गावातून मोटारसायकलवर घरी येत असताना न्हायरेमळा रस्त्यावर त्याच्या बुलेटला चारचाकीने कट मारली. त्यावेळी आकाश खाली पडला असता गाडीतील मोहन दत्तात्रय वाघ व शुभम कचरु थोरात (दोघेही रा. चांडोली बुद्रुक) यांनी खाली उतरून आकाशबरोबर बाचाबाची करून त्याला मारहाण केली.
याबाबत आकाशने फोन करून भाऊ सुरेश ज्ञानेश्वर थोरात याला कळविले. सुरेश थोरात हे घटनास्थळी आले असता कारमधील दोघांनी सुरेश थोरात यालाही मारहाण केली. सुरेश थोरात यांचा मावस भाऊ सिद्धेश गायकवाड हा त्या ठिकाणी आला असता त्यालाही मारहाण करून शिवीगाळ केली. यासंदर्भात सुरेश थोरात यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जवान ईश्वर कदम करत आहेत.