आ. शिवेंद्रराजे; शासनाकडून मंजुरी मिळवल्याबद्दल आजी-माजी नगरसेवकांकडून सत्कार
सातारा (प्रतिनिधी) – गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव अथक पाठपुराव्यातून मंजूर करून घेतल्याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा आजी-माजी नगरसेवकांनी सत्कार केला. हद्दवाढ मंजूर झाल्याने पालिकेच्या उत्पन्नात भर पडणार असून सातारा शहरासह त्रिशंकू भागाचा आणि उपनगरांचा झपाट्याने विकास होईल, असा विश्वास आ. शिवेंद्रराजे यांनी व्यक्त केला.
शहरासह उपनगरे व त्रिशंकू भागाच्या विकासाला चालना मिळण्यासाठी, पर्यायाने नागरिकांना दर्जेदार सोयीसुविधा मिळण्यासाठी हद्दवाढ होणे आवश्यक होते. त्यासाठी आ. शिवेंद्रराजे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या अभ्यासपूर्ण पाठपुराव्यामुळे पावसाळी अधिवेशनात शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव मंजूर झाला. यानिमित्त आजी-माजी नगरसेवक, त्रिशंकू भाग व उपनगरातील नागरिकांनी आ. शिवेंद्रराजे यांचा सत्कार करून आभार मानले. माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अशोक मोने, अमोल मोहिते, शेखर मोरे-पाटील, अविनाश कदम, धनंजय जांभळे, रवी ढोणे, विजय काटवटे, सौ. लीना गोरे, सौ. मनीषा काळोखे, सौ. दीपलक्ष्मी नाईक, सौ. प्राची शहाणे, सौ. सोनाली नलवडे, नासीर शेख, सचिन सारस, जयेंद्र चव्हाण, जयवंत भोसले, जगन्नाथ किर्दत, राजू गोरे, किशोर पंडित, अशोक जाधव, अतुल चव्हाण, बाळासाहेब भुजबळ, महेश महामुनी, रणजित साळुंखे, सुनील जाधव, अभिजित उबाळे, रवी माने, भाजप शहराध्यक्ष विकास गोसावी, ऍड. प्रशांत खामकर, विठ्ठल बलशेटवार, चंदन घोडके, राहुल शिवनामे उपस्थित होते.
शहराच्या हद्दवाढीस तातडीने मंजुरी मिळाल्यास मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित असलेली उपनगरे, त्रिशंकू भागातील नागरिकांना दिलासा मिळावा, पालिकेच्या उत्पन्नात वाढ होऊन शहरातील लहानमोठी विकासकामे मार्गी लागावीत यासाठी हद्दवाढीच्या प्रस्तावाचा सातत्याने पाठपुरावा केला. हा प्रश्न मार्गी लावला असून आता औद्योगिकीकरण व रोजगार निर्मितीसाठी सातारची एमआयडीसी वाढविण्याकडे लक्ष देणार असल्याचे आ. शिवेंद्रराजे यांनी स्पष्ट केले.