साथीच्या आजाराने कोपरगावात तिघांचा बळी

पंधरा दिवसात तिघांचा मृत्यू

दि. 2 ऑगस्ट रोजी जागवार उमेर खान (वय 23 वर्ष रा.गजानन नगर) 12 ऑगस्ट रोजी सार्थक राजेश वाकचौरे (वय 5 वर्ष रा. गांधीनगर) 15 ऑगस्ट रोजी ऋतुजा सतीश बगाटे (वय 16 वर्ष रा.बॅंक कॉलनी येवला रोड) यांचा डेंग्यू सदृश व साथीच्या आजाराने मृत्यू झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

कोपरगाव – कोपरगाव शहरामध्ये पंधरा दिवसांत साथीच्या आजाराने तिघांचा मृत्यू झाला. साथीच्या रोगाने शहरामध्ये झपाट्याने वाढणारी रुग्णांची संख्या व उपचारासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी घालमेल पाहून आमदार स्नेहलता कोल्हे गहिवरुन गेल्या.

शुक्रवारी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात त्यांनी अचानक भेट देऊन तिथे रुग्णांची विचारपूस केली असता महिलांनी त्यांच्यापुढे आरोग्याच्या समस्यांचा पाढा वाचला. उघड्या गटारी, वेळेवर स्वच्छता नाही, डासांचा प्रादुर्भाव, आठ दिवसांनी होणारा पाणीपुरवठा, योग्य वैद्यकीय सुविधा नाहीत, घरामध्ये एकाच वेळी अनेक जण आजारी पडले. आर्थिक तजवीज नाही.नुकत्याच आलेल्या पुराने संसार उघड्यावर पडला, अशा भयानक संकटांमध्ये सापडलेल्या अनेक महिलांनी आ. कोल्हे यांच्यापुढे आपल्या व्यथा मांडल्या.

कोपरगाव शहरात सध्या डेंग्युसदृश आजार व अन्य साथींच्याआजाराने थैमान घातले आहे. शहरातील सर्व दवाखाने हाऊसफुल झाले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून नागरिक साथीच्या रोगांनी मेटाकुटीला आले. कोपरगाव ग्रामीण रूग्णालय व संबंधीत वैद्यकिय अधिकाऱ्यांचे त्याकडे दुर्लक्ष होत असून रूग्णांना खाजगी रुग्णालयात उपचार घेणे, आर्थिक दृष्ट्‌या न परवडणारे आहे. याबाबत नागरिकांनी आ.कोल्हे यांच्याकडे तक्रारी केल्यानंतर आ. कोल्हे यांनी ग्रामीण रूग्णालयास मंगळवारी अचानकपणे भेट देवुन सर्व परिस्थिती जाणून घेत त्यांनी वैद्यकिय अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.

पालिकेच्या आरोग्य विभागाचे उपमुख्याधिकारी सुनील गोरडे यांना शहरांमध्ये रोगराई मुक्त वातावरणासाठी योग्य त्या उपाययोजना त्वरित कराव्या तसेच आरोग्याधिकाऱ्यांनी योग्य तो औषध पुरवठा करून रुग्णांच्या आरोग्याची काळजी तातडीने घ्यावी. कोणीही नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नये, डेंग्यूसदृश आजाराने कोपरगावाचे नागरिक हवालदिल झाले आहेत. पालिका प्रशासन व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना राबवाव्यात.

कागदपत्रे खेळ बंद करा, पुराच्या संकटातून नागरिकांचा जीव वाचवला. पण साथीच्या रोगाने त्यांचा जीव जात आहे. अधिकारी व पालिकेच्या दुर्लक्षापणामुळे एखाद्याचा जीव जात असेल तर कोणाची गय करणार नाही. भयानक संकटात कोणीही कोणतेही राजकारण न करता सर्व अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. रोगराई मुक्त करावे अशा सूचना आ. कोल्हे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

यावेळी प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर, हिवताप आरोग्य सहाय्यक सचिन जोशी, कोपरगाव नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे, आरोग्य निरीक्षक सुनील आरण, उपनगराध्यक्ष योगेश बागुल, अनेक नगरसेवक पदाधिकारी नागरिक उपस्थित होते. आ. कोल्हे यांनी आरोग्य विभागाची अचानक पाहणी केल्यानंतर संपूर्ण यंत्रणा खडबडून जागी झाली. पालिकेचे अधिकारी वैद्यकीय यंत्रणा गतिमान आणि कामाला लागली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.