नावंदे यांची नार्को टेस्ट करण्याची क्रीडा शिक्षकांची मागणी

रास्तारोको वर क्रीडा संघटना ठाम

नगर  – जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे या जिल्ह्यात हजर झाल्यापासून सातत्याने चर्चा व वादाचा विषय बनल्या आहेत. त्यांचे वागणे, बोलणे उर्मटपणाचे व खोटारडेपणाचे आहे. त्यांच्याशी जिल्ह्यातील क्रीडा संघटना, खेळ संघटना यांचा कुठलाही प्रकारचा पूर्ववैमनस्यातून वाद नाही. एक महिला अधिकारी म्हणून कधीही वेठीस धरण्याची भूमिका संघटनेने अथवा पदाधिकाऱ्यांनी घेतलेले नाही.

नावंदे यांनी पत्रकार परिषदेत दिलेली चुकीची माहिती म्हणजे चौकशी समितीसमोर स्वतःला वाचविण्याची केलेली कृती आहे. समन्वय समितीने केलेले आरोप खरे असून त्या आरोपावर समिती ठाम आहे. नावंदे यांच्यामार्फत जारी करण्यात आलेली प्रत्येक गोष्ट खोटी असून नावंदे यांची याबाबत नार्को टेस्ट करण्याची मागणी क्रीडा शिक्षकांनी केली आहे.

क्रीडा सुविधा देण्यास व सुधारण्यास क्रीडा संघटनांचा कधीही विरोध नव्हता. क्रीडा संकुलात सुविधा मिळाव्यात म्हणून 18 जुलैच्या बैठकीमध्ये रीतसर मागणी करण्यात आली होती. पण सुधारणेच्या नावाखाली घेण्यात आलेली रक्कम अद्यापपर्यंत क्रीडा विकासासाठी वापरण्यात आलेली नाही. इयत्ता आठवी पर्यंतच्या शालेय खेळाडूंना क्रीडांगण सुविधा मोफत देण्यासंदर्भातील शासन निर्णय असताना नावंदे यांनी शेकडो मुलांची फी घेतली.

वाडिया पार्क मैदानावर स्नेहालय, युवान व मूकबधिर सारख्या संस्थातील अनेक खेळाडू मोफत मार्गदर्शन घेत होती. असे असताना त्यांच्याकडूनही शुल्क आकारणी सुरू झाल्याने या खेळाडूंचे मैदान बंद झाले आहे. शालेय स्पर्धांची सुरुवात जुलैच्या शेवटी होत असते. या तालुका स्पर्धा अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. त्या कोणी घ्यायचा, कशा घ्यावयाच्या याबाबत कुठलेही नियोजन 15 ऑगस्ट अखेर क्रीडा कार्यालयामार्फत देण्यात आलेले नाहीत. यांच्या मनमानी विरोधात स्पर्धेसाठी विरोध न करता सर्व संघटनांनी शालेय स्पर्धेवर असहकार व पंच कामगिरीवर बहिष्कार घातला आहे.

त्यामुळे या स्पर्धांचे नियोजन क्रीडा कार्यालयामार्फत होणे अत्यावश्‍यक असताना अद्याप स्पर्धा थंडावल्या आहेत. जिल्हा स्पर्धा कालावधीतच तालुका स्पर्धा येणार असल्याने एका वेळी दोन स्पर्धेत असलेल्या खेळाडूंची अडचण होणार असल्याने हजारो खेळाडूंचे नुकसान होणार आहे. या नुकसानीबाबत जिल्हा क्रीडाधिकारी बोलण्यास तयार नाहीत.जलतरण तलावाच्या ठेक्‍यात यांची भागीदारी आहे.

क्रीडा संकुलातील मुलीच्या चेंजिंग रूम वर कब्जा करून स्वतःचे निवासस्थान थाटून शासनाचे घरभाडे घेत असल्याने शासनाची फसवणूक करत आहेत.या सर्व बाबींची सत्यता पडताळण्यासाठी नावंदे यांची नार्को टेस्ट करण्यात यावी. क्रीडा समितीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपांवर ठाम असून, सत्यता पडताळणीसाठी समिती सदस्य नार्को चाचणीस तयार असल्याची माहिती समन्वय समितीचे पदाधिकारी सुनील जाधव, संजय साठे, राजेंद्र कोतकर, आप्पासाहेब शिंदे, घनश्‍याम सानप, शैलेश गवळी आदींनी दिली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×