कोरेगाव – कोरेगाव शहराची करोना हॉटस्पॉटकडे वाटचाल सुरु असतानाच सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींवरुन नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी श्रीमती विजया घाडगे यांनी गुरुवारी शहरातील दोन चिकन सेंटर्ससह एका देशी दारु दुकानावर कारवाई केली. प्रत्येकी पाच हजार रुपये दंड आकारत ही दुकाने पाच दिवसांसाठी सील केली आहेत.
अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 यावेळेत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी असतानाही शहरातील असिफ चिकन सेंटर, ताज चिकन सेंटरसह आझाद चौक परिसरातील एका देशी दारु दुकानावर परवानगी नसताना दुकान सुरु ठेवल्याबद्दल मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी ही कारवाई केली. याबाबत सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या, अशी माहिती घाडगे यांनी दिली.
नियमांचे पालन न केल्यास नगरपंचायत प्रशासन अधिक गतीने कारवाई करणार आहे, याची व्यावसायिक व दुकानदारांनी नोंद घ्यावी, असा इशारा घाडगे यांनी दिला.