वाई (प्रतिनिधी) – पाचगणी शहरामधील एका व्यावसायिकाला ताब्यात घेवून पलायन करण्याच्या उद्देशाने आलेल्या पुण्यातील कुख्यात गुंड गज्या मारणेच्या टोळीतील 14 संशयितांना वाई पोलिसांनी सापळा लावून वाई- पाचवड रस्त्यावर हॉटेल चतुर्थी चेक पोस्टवर जेरबंद केल्याने वाई तालुक्यात खळबळ माजली आहे.
आर्थिक व्यवहारातून या व्यावसायिकाला धमकवण्यासाठी आलेल्या मारणे यांच्या टोळीतील चौदा जणांना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये मोक्काची कारवाई करण्यात आलेल्या चौघांचा समावेश आहे. एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. गुरुवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत पोलिस या सर्वांची कसून चौकशी करत होते.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पाचगणी येथे व्यावसायिक पार्टे यांच्या मालकीची नचिकेत इंग्लिश मीडियम स्कूल शाळा आहे. त्यांनी तीन वर्षांपूर्वी अहमदनगर येथील एका व्यक्तीला ती तीन वर्षांच्या भाडेतत्त्वावर चालवायला दिली होती. त्यापोटी संबंधित व्यक्तीने डिपॉझिट म्हणून एक कोटी रुपये पार्टे यांना दिले होते. मात्र, नगरच्या व्यक्तीला शाळा व्यवस्थित चालवता न आल्याने त्यांनी झालेला करारनामा रद्द करून दिलेले डिपॉझिट परत करण्याची मागणी केली होती.
यावरून दोघांच्यात अनेकवेळा चर्चा होऊन 80 लाख रुपये पार्टे यांनी नगरच्या व्यक्तीला देण्याचे कबूल केले होते. मात्र, गतवर्षी अचानक झालेल्या लॉकडाऊनमुळे पार्टे ती रक्कम देऊ शकले नाहीत. त्यानंतर पार्टे यांनी व्यवहाराबाबत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने पार्टे यांच्या बाजूने निकाल देऊन या व्यवहारांवर स्थगिती मिळवली होती. त्यामुळे नगरच्या व्यक्तीनें एक कोटी रुपये वसूल करण्याची सुपारी गज्या मारणे टोळीला दिली होती.
याबाबत अधिक मिळालेली माहिती अशी की नगरच्या व्यक्तीला अन्य काही गुन्ह्यात अटक झाली होती. त्याला पुण्यातील तुरंगात ठेवले होते. त्याठिकाणी या टोळीतील चौघांची ओळख झाली होती. गुरुवारी गज्या मारनेच्या टोळीतील पंधरा जण तीन वाहनांतून दुपारी वाईत आले. ते मोबाईलवरून सतत कॉल करून पार्टे याला जीवे मारण्याची धमकी देत होते. तू वाईला ये, असं त्याला म्हणत होते.
पार्टे यांनी याबाबतची कल्पना आपल्या वाईतील नातेवाइकांना दिली. त्यानंतर संबंधित नातेवाइकांनी वाईचे पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्याशी संपर्क साधून त्यांना सर्व हकीकत सांगितली.खोबरे यांनी गांभीर्य लक्षात घेऊन डीबी पथकाला सोबत घेत चतुर्थी हॉटेलजवळ भीमनगर तिकाटणे येथे सापळा लावला.
टोळीने काही करण्याच्या आत त्यांच्या मुसक्या आवळण्यात वाई पोलिसांना यश आले. या टोळीचा पार्टे याला उचलून घेऊन जाण्याचा डाव होता, अशी माहिती मिळत आहे. अटक करण्यात आलेल्या चौदा जणांमध्ये चारजण मोक्कातील आरोपी असून ते जामीनावर सुटले होते. रात्री उशिरापर्यंत पोलिस त्या सर्वांची कसून चौकशी करत होते. त्यामुळे अधिक तपशील समजू शकला नाही.