युनिट दोनची कामगिरी : मंदिर परिसरातील दुकानांमध्ये घरफोडी
पिंपरी – मोरया गोसावी मंदिर, चिंचवडगाव येथील पूजा साहित्याच्या दुकानातून तांब्या-पितळेच्या मूर्ती आणि वस्तू चोरून नेणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी ही कारवाई केली. चोरट्यांकडून 87 हजार 30 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
सोमनाथ संजय खरात (वय 18, रा. चिंचवड), सलीम कालू शेख (रा. वेळातनगर चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यासह त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. मोरया गोसावी मंदिर परिसरात सचिन छाजेड यांच्या दुकानातून आणि आजूबाजूच्या अन्य सात दुकानांमध्ये चोऱ्या केल्या होत्या.
तसेच डॉ. हेमंत यांच्या केशवनगर येथील दवाखान्याचे शटर उचकटून आतील 35 हजार रुपये किमतीचा आयपॅड टॅब चोरून नेला. चिंचवड स्टेशन चौकात एक इसम मूर्तींची विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सोमनाथ याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने साथीदारांसोबत मिळून वरील दोन्ही गुन्हे केल्याचे कबूल केले. तिसरा साथीदार सलीमला अटक करून तिघांकडून 87 हजार 30 रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला.