नवी दिल्ली : भारतात कोरोनाची आणखी तीन जणांना लागण झाली आहे. त्यामुळे बाधीतांची संख्या 34 वर पोहोचली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी दिली. या तीन जणांपैकी दोन जण लडाखमधील असून त्यांनी इराणला प्रवास केला होता. तर एक जण तामिळनाडूतील असून तो ओमानला जाऊन आला होता, अशे सांगण्यात आले.
भारतात विषाणू बाधीतांची संख्या 31 वर पोहोचल्या होत्या. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 52 ठिकाणी कोरोनाची चाचणी घेण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. तर 57 ठिकाणी नमुने स्वीकारण्याची सोय करण्यात आली आहे. भूतानमध्ये कोरोनाबाधीत अमेरिकन लोकांच्या संपर्कात आलेल्या 150 जणांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्यातील एकाला सर्दी आणि खोकला झाल्याने इम्फाळ येथील सरकारी रूग्णालयात विलगता कक्षात ठेवण्यात आले आहे.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोरोनोच्या देशातील परिस्थितीचा आढावा घेतला. पुरेशी विलगता सोय आणि बाधीतांना आजार वाढल्यास त्यांच्या चिंताजनक प्रकृतीची काळजी घेण्यासंदर्भात सुचना केल्या. त्यासाठी आवश्यक तरतूद करून ठेवा असेही मोदी यांनी बजावले.
इराणमध्ये बळींची संख्या 145
ईाणमध्ये शनिवारी 21 जण मरण पावले. त्यामुळे बळींची संख्या 145वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत नवे एक हजार 76 रुग्ण आढळले असीन एकूण बाधीतांची संख्या पाच हजार 823 वर पोहोचली आहे. या शिवाय संशयित म्हणून 16 हजार जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर एक हजार 669 जण या संसर्गापासून मुक्त झाले आहेत.