पुणे – शहरात करोना बाधितांचा आकडा दररोज तीन ते चारने वाढतच आहे. हा वाढता आकडा वेळीच रोखायचा असेल तर पुढील दोन आठवडे नागरिकांनी एक जबाबदारीच्या भावनेतून घरातच थांबावे, कितीही आवश्यक काम (वैद्यकीय सेवा वगळता) असले तरी घराबाहेर पडू नये. स्वत:ला घरातच विलगीकरण करून घ्यावे. तरच ही संसर्गाची साखळी तुटेल आणि शहर करोनामुक्त होण्यात यश मिळेल. दरम्यान, बुधवारी (दि. 1) शहरात आणखीन तीन करोना बाधित रूग्ण आढळून आले असून, त्यातील दोन नायडू तर, एक रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल आहे.
सध्या शहरात करोना बाधितांची संख्या 33 इतकी झाली असून, पिंपरी-चिंचडमध्ये 12 आणि ग्रामीण भागात 7 असे एकूण 52 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. त्यातील पुणे शहरातील 8 आणि पिंपरी-चिंचवडमधील 10 आणि ग्रामीण भागातील 4 जणांना घरी सोडले. त्यामुळे सध्या नायडू रुग्णालयात 24 तर, शहरातील विविध खासगी रुग्णालयांत 6 असे एकूण 30 रुग्ण उपचार घेत आहेत. यातील एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक आहे.
दरम्यान, बुधवारी दिवसभरात केलेल्या तपासणीमध्ये 69 व्यक्तींचे नमुने राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था (एनआयव्ही) यांच्याकडे तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यांचा अहवाल संध्याकाळपर्यंत येईल, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. आतापर्यंत पुण्यात दाखल झालेल्या एक हजार 25 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यातील 917 जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत.