वाठार स्टेशन: सोनके, ता.कोरेगाव येथील जगतापनगर येथे 21 ऑक्टोबर रोजी ट्रकचालक गणेश राजाराम जगताप (वय 35, रा. वडगाव, ता. फलटण) यांना मारहाण झाली होती. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी वाठार स्टेशन पोलिसांनी आणखी तीन संशयितांना अटक केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे, गणेश जगताप हे आळजापूर येथील संतकृपा डेअरीच्या दूध टॅंकरवर चालक म्हणून काम करत होता. ते दि. 21 ऑक्टोबर रोजी टॅंकर घेऊन निघाले होते. सोनके, ता. कोरेगावनजीक जगतापनगर येथे आल्यावर टॅंकरचा एका मुलीला धक्का लागला होता. त्यावेळी तेथील चार ते पाच जणांनी जगताप यांना लोखंडी सळई व काठीने बेदम मारहाण केली होती. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पत्नीने वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल धोंगडे व कर्मचाऱ्यांनी सुनील दत्तात्रय जगताप, मुलीच्या उपचारासाठी पैशाची मागणी करणारा जगतापनगरचा सरपंच दादासाहेब हणमंत जगताप व धनाजी किसन भागवत यांना अटक केली होती. त्यानंतर रणजित मारुती जगताप (वय 38), हणमंत हरिभाऊ जगताप (वय 46), अजित कृष्णराव जगताप (वय 48) यांना अटक करून पोलिसांनी तिघांना कोरेगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले. न्यायालयाने तिघांना 8 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला असून सपोनि स्वप्निल धोंगडे तपास करत आहेत.